मातृभाषा वेगळीच असल्याने गोव्यात परप्रांतीय विद्यार्थ्यांना शिकवणे अवघड!

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

पालकांशी संवाद साधण्यातही शिक्षकांना समस्या

म्हापसा: मातृभाषा वेगळीच असल्याने गोव्यात परप्रांतीय विद्यार्थ्यांना शिकवणे शिक्षकांना अवघड झालेले आहे. ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक विद्यालयांत मोठ्या संख्येने गोव्यात दीर्घ काळ स्थायिक असलेल्या परप्रांतीय कामगारांची मुले शिक्षण घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्यात शिक्षकवर्गाला सध्या समस्या निर्माण होत आहेत.

अशा मूळच्या परप्रांतीय मुलांचे पालक मजूरवर्गातील असल्याने ते पालक संवाद साधण्यासाठी शिक्षकांना उपलब्धही होत नाहीत. सध्या विद्यालयांतील नियमित वर्ग बंद असून, मोइलच्या माध्यमातून तसेच वर्कशीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जात असतो. यासंदर्भात पालकांशी संवाद साधणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत पालकवर्गच सहसा घरी उपलब्धच नसतो अथवा त्या पालकांना विद्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधणे शक्य होत नाही.

काही पालक कन्नडभाषिक असून त्यांची मुले मराठी माध्यमातून शिक्षण घेत असली तरी त्यांच्याशी संवाद साधणे शिक्षकांना भाषाभिन्नतेमुळे शक्य होत नाही. अशा वेळी त्या शिक्षकांना तोडक्यामोडक्या हिंदीचा आधार घेत काम भागवावे लागते. मजूरवर्गातील बहुतांश पालकांना हिंदी समजते; परंतु, ते वापरत असलेली हिंदीची बोली वेगळीच असल्याने त्यांच्याशीही सुलभरीत्या संवाद साधणे शिक्षकांना कठीण होऊन जाते.

गोव्यात मराठी माध्यमातून शिक्षण घेणारे परप्रांतीय प्रामुख्याने महाराष्ट्र, झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यांतील आहेत. महाराष्ट्रातील मुलांबाबत हा प्रश्न फारसा भेडसावत नाही. परंतु, अन्य राज्यांच्या बाबतीत हा प्रश्न प्रकर्षाने भेडसावतो.

परराज्यातील कामगार गोव्यात मोठ्या प्रमाणात मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह करीत आहेत. पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचे वास्तव्य गोव्यात असल्याने त्या कामगारांना गोवा राज्याची रेशनकार्डे, मतदार ओळखपत्रे व आधारकार्डेही मिळालेली आहेत. त्यापैकी बहुतांश कामगार ग्रामीण भागांत भाडोत्री खोलीत राहतात. इमारतीच्या बांधकामासंदर्भातील विविध कामे ते कामगार करीत असतात. त्या कामगारांची लहान मुले खासखी शाळांऐवजी जास्त करून सरकारी प्राथमिक शाळेतून मराठी माध्यमातून शिक्षण घेत असतात.

बहुतांश कामगारांची मुले मराठी माध्यम असलेल्या शाळांतून शिक्षण घेत असली तरी कन्नड, हिंदी अशा भिन्न भाषा-संस्कृतीतून आलेल्या त्या लहान मुलांना शिक्षण देताना शिक्षकांना बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. अशा परिस्थितीतही प्राथमिक शाळांतील शिक्षक पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांकरवी अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

प्राथमिक शाळेतून शिक्षण घेणाऱ्या मराठी माध्यमाच्या मुलांना वर्कशीट दिल्यानंतर, ज्यांना मराठी भाषा नीटपणे अवगत नाही, असे काही पालक शेजाऱ्यांची व मित्रमंडळीची मदत घेऊन मुलांचा अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असतात. पालकांशी संपर्क साधून मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे. स्वत:च्या शाळेतील मुलांनी चांगला अभ्यास करून परीक्षेत अव्वल गुण प्राप्त करावे या दृष्टीने बहुतांश पालक प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांनी पालकांचे व मुलांचे व्हॉट्‍स ॲप ग्रुप तयार केले आहेत. सरकारी शाळेत मुले येत नसली तरी सर्व मुले आपापल्या घरी अभ्यास पूर्ण करण्यासाठी पालकांच्या मदतीने प्रयत्नशील आहेत.
 

संबंधित बातम्या