अन्नधान्याच्या बाबतीत गोवा बनेल स्वावलंबी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

आत्मनिर्भर भारतासोबत स्वयंपूर्ण गोवा बनवणे शेतकऱ्यांच्या हाती आहे. भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

पणजी: आत्मनिर्भर भारतासोबत स्वयंपूर्ण गोवा बनवणे शेतकऱ्यांच्या हाती आहे. भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. कृषी व्यवस्थेतील दलाली भाजपने बंद केली असून त्या दलालांची पाठराखण कॉंग्रेस करत आहे. शेतकऱ्यांनी भाजपचे सरकार आपले सरकार मानले आहे त्यांच्या बळावरच अन्नधान्याच्या बाबतीत आज परावलंबी असलेला गोवा यापुढे स्वावलंबी बनेल, असे उद्‍गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पेडणे येथे काढले.

आत्मनिर्भर भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या घोषणेस स्वयंपूर्ण गोवा ही जोड मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. त्यात गोव्‍याला कृषी उत्पादने, दुग्धोत्पादन, कुक्कुट्टपालन यात स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न मुख्यमंत्र्यांनी पाहिले आहे. त्याला पुरक असा उपक्रम आज केंद्रीय पातळीवर राबवण्यात आला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेखाली शेतकऱ्यांना पुढचा हप्ता आज देण्यात आला. यामुळे राज्यातील शेतकरी आता स्वयंपूर्ण गोवा बनवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राज्यातून मुख्यमंत्र्यांसह विविध नेते सहभागी झाले होते. यामुळे अनेक वर्षांनी गोव्यात शेतीकडे लक्ष देणारे सरकार सत्तारुढ झाल्याचे वातावरण आज तयार झाले. शेतकरीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमांत सहभागी झाले होते. किसान योजनेखाली ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या एकूण १८ हजार कोटी रुपये जमा केले गेले.

पेडणे येथील पेडणे तालुका सहकारी सोसायटी मधील कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत मंचावर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि आमदार दयानंद सोपटे होते. पीर्ण येथील कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर,डिचोली येथील कार्यक्रमास विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर,पाळी-साखळी येथील कार्यक्रमास केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, धारबांदोडा-कुळे येथील कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर,केपे येथील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर ,सांगे येथील कार्यक्रमास आमदार सुभाष शिरोडकर,भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव गावकर,माजी आमदार सुभाष फळदेसाई तर काणकोण येथील कार्यक्रमास विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस उपस्थित होते. प्रत्येक ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

आणखी वाचा:

नाताळ सण मोठा, नाही आनंदा तोटा - 

संबंधित बातम्या