"गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपची लबाडी"

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणुकीसंदर्भात मतदानाची नवीन तारीख जाहीर करण्यात भाजपची लबाडी प्रकर्षाने दिसून येते, असा घणाघाती आरोप अखिल गोवा पंचायत लोकशाही मंचचे अध्यक्ष, कळंगुटचे माजी सरपंच जोजफ सिक्वेरा तसेच उपाध्यक्ष तथा सडयेचे माजी सरपंच फ्रान्सिस फर्नांडिस यांनी केला.

म्हापसा: जिल्हा पंचायत निवडणुकीसंदर्भात मतदानाची नवीन तारीख जाहीर करण्यात भाजपची लबाडी प्रकर्षाने दिसून येते, असा घणाघाती आरोप अखिल गोवा पंचायत लोकशाही मंचचे अध्यक्ष, कळंगुटचे माजी सरपंच जोजफ सिक्वेरा तसेच उपाध्यक्ष तथा सडयेचे माजी सरपंच फ्रान्सिस फर्नांडिस यांनी केला.

यासंदर्भात श्री. सिक्वेरा म्हणाले, की राज्य सरकारने आणि पर्यायाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धूर्तपणा व कावेबाजपणा करून जिल्हा पंचायतींसंदर्भात विरोधकांना गाफील ठेवले. ते मतदान जानेवारीत होईल अशा आशयाचे विधान पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी करणे व आडमार्गाने सत्ताधारी पक्षाने स्वत:चे इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करणे हे सारे गैर तथा निंदनीय आहे. मतदानाची तारीख घाईगडबडीत जाहीर करून पुन्हा आचारसंहिता लागू करण्यात आल्यानुसार आता उमेदवारांना प्रचारकार्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होणार नाही. सरकार भाजपचे असल्याने उमेदवारही काहीच करू शकत नाहीत व न्यायालयात गेलो तरी वेळ कमी असल्याने न्याय मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे, भाजपच्या या कपट नीतीच्या बाबतीत मतदारांनीच उमेदवारांना न्याय मिळवून देण्यावाचून गत्यंतर नाही, असेही श्री. सिक्वेरा यांनी सांगितले.

निवडणुका पुढे ढकलून सुमारे आठ-नऊ महिन्यांचा अवधी उलटला असल्याने प्रचार करण्यास उमेदवारांना किमान पाच-सहा दिवस देणे आवश्यक होते, असे यासंदर्भात बोलताना काही उमेदवारांनी सांगितले. मतदानाची तारीख अचानक जाहीर केल्याने अपेक्षित प्रमाणात मतदान होणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या या धूर्तपणाच्या विरोधात आता जनतेनेच त्यांना योग्य तो धडा शिकवावा, अशी प्रतिक्रिया बार्देश तालुक्यातील हणजूण जिल्हा पंचायत मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ऐश्वर्या साळगावकर यांनी व्यक्त केली.

अखिल गोवा पंचायत लोकशाही मंचचे उपाध्यक्ष फ्रान्सिस फर्नांडिस म्हणाले, आठ-नऊ महिन्यांपूर्वी जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण होत येत असताना अंतिम टप्प्यात मतदानाच्या दोन दिवस अगोदर कोविडमुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता कित्येक महिने उलटलेले असल्याने प्रचारासाठी किमान चार-पाच दिवस उमेदवारांना देणे आवश्यक होते; कारण, त्या दीर्घ कालावधीमुळे संबंधित मतदारसंघात उमेदवार नेमके कोण आहेत, हे मतदारही विसरलेले आहेत.

मंचचे खजिनदार तथा रेईश-मागूशचे पंचायत सदस्य विरेंद्र शिरोडकर यांनी मतप्रदर्शन करताना सांगितले, की सध्या घाईगडबडीत या निवडणुका घेण्यास तसे ठोस कारणच नव्हते. उमेदवारांना मतदानाच्या तारखेबाबत आगाऊ सूचना देणे आवश्यक होते. प्रत्येक जिल्हा पंचायत मतदारसंघात सुमारे तीन-चार ग्रामपंचायती समाविष्ट असल्याने त्या उमेदवारांना आता दीर्घ काळानंतर पुन्हा प्रचारकार्य करण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे होते.

ऐश्वर्या साळगावकर यासंदर्भात म्हणाल्या, की गेल्या सुमारे एका महिनाभराच्या कालखंडात भाजपने छुप्या मार्गाने प्रत्येक भागात प्रचारकार्य केले; कारण त्यांना मतदानाची तारीख आधीच माहीत होती. त्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी शासकीय विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरेही घेण्यात आली. मतदानाची तारीख राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार असे सरकारपक्षातील सदस्यांनी व भाजपाच्या नेत्यांनी जाहीर करणे हा त्यांनी रचलेले ते नाटकच होते व जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचा तो प्रयत्न होता, असेही त्या म्हणाल्या. या बाबतीत सर्व राजकीय पक्षांना व सर्व उमेदवारांना समान न्याय मिळणे नीतिनियमांना धरून झाले असते, असेही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा:

राजधानी पणजीत आंदोलनांचे पेव ; जीवरक्षक संघटनेचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू -

घाईगडबडीत १२ डिसेंबर रोजी निवडणुका घेणे अयोग्यच आहे. सध्याच्या परिस्थितीत आगामी जानेवारी महिन्यातच मतदान घेणे योग्य होते; कारण, तोपर्यंत कोविडचाही प्रभाव थोडाफार कमी झाला असता. मतदानाची तारीख आगाऊ जाहीर करून उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ दिला असता, तर उमेदवारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असता.
फ्रान्सिस फर्नांडिस (माजी सरपंच, सडये)

 

संबंधित बातम्या