Goa: फोंडा पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच सोपो कर गोळा करण्याचा निर्णय

Goa: फोंडा पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच सोपो कर गोळा करण्याचा निर्णय
ponda corporation.jpg

फोंडा: फोंडा (Ponda) पालिकेचे सोपो कराचे कंत्राट रद्द करून पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच सोपो कर (Sopo Tax) गोळा करण्याचा निर्णय फोंडा पालिकेने घेतला आहे. कोविड महामारीमुळे निर्धारित सोपो गोळा करणे शक्य नसल्याने सोपो करात सूट देण्याची मागणी सोपो कंत्राटदाराने फोंडा पालिकेकडे केल्यानंतर कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याने आणखी कंत्राटदाराकडून सोपो गोळा करण्यापेक्षा तो पालिकेकडूनच थेट वसूल करण्याचा निर्णय झाला. (It was decided to collect easy tax from the employees in ponda corporation)

कोविड महामारी आटोक्यात आल्यानंतर सोपो करासंबंधीचा आढावा घेऊन पुन्हा कंत्राट देण्याचा विचारही यावेळी झाला. सोपोकराबरोबरच फोंडा मार्केट प्रकल्प तसेच पालिकेच्या सुवर्णमहोत्सवी इमारत प्रकल्पासंबंधीही फोंडा पालिकेच्या आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत चर्चा झाली. 

फोंडा नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला इतर नगरसेवक उपस्थित होते. पालिका मुख्याधिकारी प्रदीप नाईक यांनी बैठकीचे कामकाज हाताळले. फोंडा पालिकेच्या सोपो कर कंत्राटदाराच्या पत्रासंबंधी प्राधान्याने विचार करण्याबरोबरच वरचा बाजार भागातील मार्केट प्रकल्प पूर्णपणे सुरू करण्याचाबाबतही विचार झाला. या मार्केट प्रकल्पाचे वीज तसेचे इतर काम पूर्ण करून लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्णपणे वापरात आणण्यावर चर्चा झाली. या इमारत प्रकल्पात बसवलेले दोन्ही वीज ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त बनल्याने त्यांची दुरुस्ती करण्यासंबंधी वीज खात्याला कळवण्यात येणार असून, ही कामे पूर्ण झाल्यावर प्रकल्प पूर्णपणे सुरू करण्याबाबत विचार होईल. 

फोंडा पालिका क्षेत्रातील गोल्डन ज्युबिली इमारत प्रकल्पाचे काम सध्या रखडले आहे. या इमारत प्रकल्पासाठी आधी जो अंदाजित खर्चाचा आराखडा केला होता, त्या दराचे आताच्या दराशी सांगड होत नसल्याने कंत्राटदाराने अंदाजित खर्चाचा पुन्हा आढावा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता आहे ते कंत्राट रद्द करून नवीन आराखडा तयार करण्यासंबंधी विचारविनिमय करून निर्णय घेण्यात आला. 

मार्केट प्रकल्पातील लिलावाचे त्रांगडे..!

फोंडा बुधवारपेठ नूतन मार्केट प्रकल्पातील अनेक दुकानांचा लीलाव करण्यात आला आहे. यातील काही दुकानांचा लीलाव करताना एकच लीलावदार आला. अन्य काही दुकानांच्या लीलावावेळी तीन व जास्त लीलावधारकांनी बोली लावली होती. मात्र, एकच लिलावधारकाने बोली लावल्याने पालिका प्रशासन संचालनालयाने या प्रकाराला आक्षेप घेतला आहे. नव्याने या दुकानांचा लीलाव करण्याची सूचना फोंडा पालिकेला केली आहे. त्यामुळे या दुकानांचा पुन्हा एकदा लीलाव पुकारण्याचे त्रांगडे बनले आहे.

शास्त्री सभागृह इमारतीतील दुकानदारांचे स्थलांतर होणार!

पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या शास्त्री सभागृह इमारत धोकादायक बनली आहे. या इमारतीतील चार दुकानदारांना दुसरीकडे स्थलांतर करण्यासंबंधी सूचना केली होती. या चारही दुकानदारांना वरचा बाजार मार्केट प्रकल्पात स्थलांतर करण्यासंबंधी सांगितले होते, मात्र गोल्डन ज्युबिली इमारत प्रकल्पात या दुकानदारांचे स्थलांतर होणार असल्याने त्यांनी वरचा बाजार मार्केट प्रकल्पात तेवढे गिऱ्हाईक होणार नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे सध्याच्या इमारतीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत शेड उभारून तेथे या दुकानदारांना स्थलांतर करण्याबाबत विचार झाला असल्याचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.