चोरीला गेलेल्या रोपट्यांचा वनखात्यानेच लावला जावईशोध

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

रोपटी वाढल्यानंतर कोळसा प्रदुषणाची मात्रा कमी होईल अशी अपेक्षा ठेवण्यात आली होती.वर्षभर रोपटी वाढल्यानंतर कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक लावलेली सर्व रोपटी गायब करण्यात आली.

 

मुरगाव : वास्को येथील एलमाँत थिएटर ते सडा पर्यंतच्या सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला कोळसा प्रदुषणापासून जनतेचे रक्षण करण्यासाठी लावलेली ती तीन हजार रोपटी नव्हती तर झुडपे होती असा जावईशोध वनखात्याने लावून चोरीला गेलेल्या त्या सर्व रोपट्यांचा तपास बंद केला आहे.

   मुरगाव बंदरातील कोळसा कंपन्यांनी सामाजिक जबाबदारी योजनेतून खर्च करून मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १७अ येथे एका बाजूला रांगेत रोपटी लावली होती.ही रोपटी वाढल्यानंतर कोळसा प्रदुषणाची मात्रा कमी होईल अशी अपेक्षा ठेवण्यात आली होती.वर्षभर रोपटी वाढल्यानंतर कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक लावलेली सर्व रोपटी गायब करण्यात आली.याप्रकरणी सर्व प्रथम दै.गोमन्तकने प्रकाशझोत टाकून संबंधितांचे लक्ष वेधले.सडा येथील समाजसेवक तथा आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी वृत्ताची दखल घेऊन मुरगाव पोलिस आणि वन खात्याकडे तक्रार केली.तथापि, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही पण वन खात्याने दखल घेऊन चौकशी केली.रोपटी गायब करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न होऊन सुद्धा वनखात्याने कुणाला तरी वाचविण्यासाठी ती रोपटी नव्हती तर झुडपे होती असा दावा करुन श्री.दिवकर यांची तक्रार फाईल बंद केली आहे.

   दरम्यान,मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला लावलेली रोपटी वाढल्यानंतर या महामार्गावर हिरवळ फुलणार होती.परीणामी हवेत उडणारी कोळशाची भुकटी या वाढलेल्या रोपट्यांमुळे घरादारात पसरणार नव्हती.कोळसा कंपन्यांनी जनतेच्या भल्यासाठी लाखो रुपये खर्च करून एका रांगेत सुमारे तीन हजार रोपटी लावली होती.ती दिड- दोन मीटर उंच वाढल्यावर अज्ञातांनी गायब केली.ही रोपटी कोणी चोरुन नेली ह्याचा तपास मुरगाव पोलिस आणि वनखात्याने करावा यासाठी आरटीआय कार्यकर्ते श्री.दिवकर हे गेल्या चार - पाच महिन्यांपासून संबंधितांकडे पत्रव्यवहार करीत आहेत.अखेर वन खात्याच्या दक्षिण गोवा कार्यालयाने ती रोपटी नव्हती तर झुडपे होती त्यामुळे ती हटविल्याचा निवाडा देऊन श्री.दिवकर यांच्या तक्रारीची फाईल बंद केली आहे.

संबंधित बातम्या