गोमंतकीयांच्या शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

 गोमंतकीयांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांना भाज्या विक्री करण्यासाठी गावातच सोय व्हावी, या उद्देशाने फलोत्पादन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा कृषी मंत्री बाबू कवळेकर यांनी दिली. 

सासष्टी : गोव्यात कृषी क्षेत्राचा विस्तार होण्यास सुरुवात झाली असून यंदा मोठ्या प्रमाणात पडीक राहिलेल्या शेतजमिनीत लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत.  गोमंतकीयांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांना भाज्या विक्री करण्यासाठी गावातच सोय व्हावी, या उद्देशाने फलोत्पादन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा कृषी मंत्री बाबू कवळेकर यांनी दिली. 

मडगाव येथील दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्रात जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री कवळेकर यांनी वरील उदगार काढले. यावेळी कृषी  संचालक नेव्हील आफांसो, विज्ञान कृषी केंद्रचे प्रकल्प प्रमुख चंद्रहास देसाई, दक्षिण गोवा केव्हके विभागाच्या गृह विज्ञान विषय तज्ञ गीता वेलिंगकर, मडगाव कृषी यांत्रिक अधिकारी महेश बोकाडे व इतर उपस्थित होते. 

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या जागतिक अन्न दिवसाचे महत्व वाढले असून कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिक रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देत आहे. पोषक आहाराने रोग प्रतिकार शक्ती वाढविणे शक्य असून कृषी विभागही रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पिकाची लागवड करण्यासाठी सध्या संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे, अशी माहिती मंत्री कवळेकर यांनी दिली. कोरोनाचा पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना फटका बसू नये, यासाठी कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांनी एकत्र राहून काम केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोरोना विषाणूमुळे आलेल्या या आव्हानात्मक परिस्थितीत रोग प्रतिकार शक्ती हीच सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावत असून रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पिकांची शेतकऱ्यांनी लागवड करावी, यासाठी सुपर फूड ही योजना सुरू केली आहे. 

संबंधित बातम्या