नळाचे पाणी गेले कुठे?

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हापसा येथील पाणीपुरवठा विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी यासंदर्भात तक्रारी करूनही काहीच फायदा झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

 म्हापसा: बार्देश तालुक्यातील बहुतांश भागांत गेल्या सुमारे सात-आठ दिवसांपासून नळाद्वारे अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हापसा येथील  तील अधिकाऱ्यांशी यासंदर्भात तक्रारी करूनही काहीच फायदा झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

खात्याच्या म्हापसा येथील कार्यालयातील शासकीय अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बार्देश आणि डिचोली भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जल प्रकल्पाच्या काही भागाचे नूतनीकरण करण्यात येत असल्याने आणखीन काही दिवस त्या भागाला सुरळीतपणे जलपुरवठा करणे शक्य होणार नाही. तथापि, यासंदर्भात ते उघडपणे  बोलण्यास टाळाटाळ करीत आहेत. अधिकृतरीत्या अधिक माहिती हवी असल्यास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अथवा खात्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधा, असे ते अधिकारी खासगीत बोलताना सांगत आहेत.

मागच्या कित्येक दिवसांपासून शिवोली विधानसभा मतदारसंघात तसेच म्हापसा शहरातील काही भागांत पाण्याचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. नळाचे पाणी अचानक गायब झाल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. नियमित वेळांत पाणी उपलब्ध नसल्याने नोकरीसाठी परगावी जाणाऱ्यांची परिस्थिती फारच दयनीय झाली.  काहींना तर घरात जेवण बनवणेसुद्धा पाण्याअभावी  शक्य  झाले नाही. त्यामुळे, त्‍यांनी उपाहारगृहांतील खाद्यजिन्नस घरी आणली. काहींनी विविध कंपन्यांचे सीलपॅक मिनरल वॉटर बॉटल्स आणून स्वत:पुरती तात्पुरती व्यवस्था  केली.

अनेकांच्या घरांत शौचविधी आटोपण्यासही पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे काही निवासी वसाहतीतील लोकांनी संयुक्तरीत्या टँकरचे पाणी मागवून घेतले. काही गरीब लोकांनी तळ्याचे किंवा जवळच्या विहिरीचे पाणी दुचाकी वाहनांवरून स्वत:च्या घरात आणले.

संबंधित बातम्या