आजही जोरदार बरसणार, उद्या-परवा जोर ओसरेल

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

अग्निशामक दलाकडे सहा कॉल ः झाडे पडण्याचे प्रकार

पणजी, 

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्‍याचा प्रभाव आजच्याप्रमाणे उद्या, बुधवारीही राहणार आहे. त्यामुळे उद्याही पावसाचा जोर राहणार असून, गुरुवार आणि शुक्रवारी त्याचा जोर ओसरेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सोमवारी राज्याच्या हवामान खात्याने शहरात ऑरेंज ॲलर्ट जारी केला होता. त्यानुसार आज राज्यात काही प्रमाणात सोसाट्‍याचा वाऱ्यासह पाऊस कोसळला. परंतु दिवसभरात काही काळ संततधार पावसाने हजेरी लावली. रविवारी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्‍टा तयार झाल्याने त्याचा परिणाम किनारपट्‍टीवर होणार असल्याचे हवामान खात्याने शक्यता वर्तविली होती. काल (सोमवार) पासून थांबून थांबून पडत असलेल्या पावसाने रात्री जोर धरला. मध्यरात्री वीज जाण्याचे प्रकारही घडले. चक्रीवादळाची शक्यता वर्तविली असली तरी मोठ्‍या प्रमाणात हवेचा दाब जाणवला नाही.
आज पहाटेपासून पावसाने थांबून थांबून हजेरी लावली. पावसाने सुरुवात केल्याने अडगळीत पडलेल्या छत्र्या घेऊन नागरिक बाहेर पडले होते. त्याशिवाय सकाळी नोकरीवर जाणारा कामगारवर्गही रेनकोट घालूनच घराबाहेर पडताना दिसला. हवामान खात्याने प्रति तासी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहील अशी वर्तविलेल्या शक्यतेचा परिणाम काही ठिकाणी झाडे पडण्यावर झाला. अग्निशामक दलाकडे आज दिवसभरात सहा कॉल आले. त्यात नागाळी परिसरातून दोन, आल्तिनो येथून एक, ताळगाव येथून १ तर जुने गोवा आणि रायबंदर येथील प्रत्येक एक असे कॉल आले.
मागील चोवीस तासांत हवामान खात्याकडे ०१३.६ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. पुढील ४८ तासांत थांबून-थांबून पावसाची शक्यता खात्याने वर्तविली आहे. त्याशिवाय पुढील ४८ तासांत समुद्रात ताशी ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

संबंधित बातम्या