मिरामारच्या स्वच्छतेला लागणार चार-पाच दिवस!

विलास ओहाळ
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

मिरामार किनाऱ्यावर गेली काही दिवसांपासून समुद्रातून वाहून किनाऱ्यावर मोठ्‍या प्रमाणात लाकूड-काठ्‍या वाहून आलेल्या आहेत. त्याशिवाय त्याच्याबरोबर कचऱ्याचेही प्रमाण विलक्षण आहे.

पणजी

मिरामार किनाऱ्यावर गेली काही दिवसांपासून समुद्रातून वाहून किनाऱ्यावर मोठ्‍या प्रमाणात लाकूड-काठ्‍या वाहून आलेल्या आहेत. त्याशिवाय त्याच्याबरोबर कचऱ्याचेही प्रमाण विलक्षण आहे. त्यामुळे किनारा पूर्णपणे साफ करण्यापूर्वी सध्या वाहून आलेली लाकडे काढण्याचे काम पर्यटन महामंडळातर्फे केले जात आहे. सध्या किनाऱ्याची धूप मोठ्‍याप्रमाणावर होत असून, सुरूची झाडे कोसळण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत.
मिरामार किनाऱ्याची पावसामुळे अगोदरच धूप होत आहे. त्यातच अलिकडे समुद्राच्या भरतीचे पाणी किनाऱ्याच्या तटापर्यंत येऊन पोहोचू लागले आहे. किनाऱ्यावर असलेल्या सुरूच्या बनालाही आता त्या पाण्याचा धोका पोहोचला आहे. अनेक सुरूची झाडे किनाऱ्याची धूप झाल्याने उन्मळून पडलेली आहेत. त्याचबरोबर किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेली झाडांची खोडे आणि इतर मोठमोठे ओंडके सुध्दा पडलेली दिसून येत आहेत. सध्या गेली दोन-तीन दिवसांपासून ही लाकडे टेम्पोने भरून नेण्याचे काम सुरू आहे.
परंतु किनाऱ्यावरील साफसफाईचे काम अद्याप सुरू झालेले नाही. जेवढा कचरा काढेल, तेवढा पुन्हा येत असल्याचे लाकूड उचलणारे कामगार सांगतात. त्यामुळे सर्व लाकडे उचलल्यानंतर किनाऱ्याची सफाई केली जाईल, असे चित्र आहे. पर्यटन महामंडळाच्या ताब्यात हा किनारा असल्याने महामंडळ किनाऱ्याची धूप वाचविण्यासाठी काहीच प्रयत्न करताना दिसत नाही. एकंदर किनाऱ्याची साफसफाई जरी पर्यटन खाते करीत असले तरी कचरा महापालिकेला उचलून न्यावा लागतो. महापालिकेने अनेकवेळा या किनाऱ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी आपणाकडे मागितली, पण पर्यटन महामंडळ ते देईना झाले आहे. त्यामुळे सध्या किनाऱ्यावर फेरफटका मारायला येणाऱ्या लोकांना कचऱ्यात उभे राहूनच छायाचित्रे काढावी लागत आहे.

goa goa

संबंधित बातम्या