"त्या विषयावर बोलण्याचा अधिकार केवळ प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनाच"

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

लोबो यांच्यावर आता पक्षाकडून कारवाई केली जाणार का, असे विचारले असता श्री. तानावडे म्हणाले, त्यांनी ते विधान नेमके कोणत्या हेतूने केले हे मला माहीत नाही.

म्हापसा: कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या फेररचनेसंदर्भात व सहकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेबाबत केलेले वक्तव्य गैरच असून, त्या विषयावर बोलण्याचा अधिकार केवळ प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांना आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी व्यक्त केले. 

म्हापसा पालिकेचे माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांच्या वाढदिवसानिमित्त शेट्येवाडा येथे आयोजित रक्तदान शिबिरास उपस्थित राहिले असता पत्रकारांसमोर बोलताना या विषयासंदर्भात तानावडे यांनी पक्षाची भूमिका मांडताना लोबो यांच्या एकंदर भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

लोबो यांच्यावर आता पक्षाकडून कारवाई केली जाणार का, असे विचारले असता श्री. तानावडे म्हणाले, त्यांनी ते विधान नेमके कोणत्या हेतूने केले हे मला माहीत नाही. वास्तविक, सहकारी मंत्र्यांच्या कार्यक्षमतेबद्दल लोबो यांनी वक्तव्य करणे पक्षशिस्तीच्या दृष्टीने अनुचितच आहे. कोणाही मंत्र्याला त्यासंदर्भात बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी जाहीर वक्तव्य न करता पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. यापुढे तसे करू नये असे लोबो यांना पक्षाच्या वतीने समज देण्यात आली आहे. सर्व मंत्री एकमेकांचे सहकारी असतात. त्यामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला मंत्रिदावरून काढून टाका अशी मागणी कुणीही मंत्री जाहीरपणे करू शकत नाही. एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे न बोलता पक्षासमोर स्वत:ची भूमिका मांडावी, असे लोबो यांना सूचित करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. तानावडे यांनी दिली.

पक्षाध्यक्ष या नात्याने मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विषयावर लोबो आपणाशी बोलले होते काय, असे विचारले असता तानावडे म्हणाले, ‘‘मला त्यांचे म्हणणे केवळ वृत्तपत्रांच्या माध्यमातून समजले. माझ्याकडे मायकल लोबो त्या विषयावर कधीच बोलले नाहीत. कुणाला मंत्रिमंडळातून वगळायचे आणि कुणाला समाविष्ट करायचे हे मुख्यमंत्री व पक्ष ठरवणार आहे. त्यामुळे कुणीही बेताल वक्तव्ये करू नये.’’
‘‘मंत्रिमंडळात फेरफार करण्याचा सध्या तरी पक्षाचा विचार नाही. सध्या जिल्हा पंचायत आणि पालिका निवडणुका जवळ आल्या असल्याने अशा परिस्थितीत कुठलाही राजकीय पक्ष मंत्रिमंडळाची पुनर्रचना करूच शकत नाही, हा आजपर्यंतचा अनुभव आहे’’, असा दावा करून श्री. तानावडे म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळात फेरफार केला जाईल या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, एवढे मात्र मी ठामपणे सांगू शकतो.’’

पत्रकारांच्या एका प्रश्नासंदर्भात स्पष्टीकरण देताना श्री. तानावडे यांनी पुनरुच्चार केला, की भाजप प्रत्येक निवडणुकीला तेवढेच महत्त्व देते. त्यामुळे जिल्हा पंचायत ही आगामी विधानसभा निवडणुकांची उपान्त्य फेरी अथवा उपउपान्त्य फेरी आहे असे आम्हाला वाटतच नाही. आमचा पक्ष जिंकणारच या ईर्षेने पक्षाचे नेते व कार्यकर्ते कार्यरत असतात. गोव्यात हल्लीच्या काळात प्रत्येक निवडणुकीत संबंधित मतदारसंघातील स्थानिक प्रश्न आणि स्थानिक उमेदवार या निकषांवर बव्हंशी उमेदवार विजयी ठरत असतात.

सध्या जशी राजकीय पक्षांची संख्या वाढली आहे, तशी प्रसिद्धी माध्यमांची संख्याही खूपच वाढली आहे. त्यांना वार्तांकनासाठी सनसनाटी बातम्या हव्या असतात. त्यामुळे नवीन काही तरी करण्याच्या प्रयत्नांतून आणि त्यासंदर्भातील नाहक उपद्‍व्यापांमुळे अशा निराधार बातम्या पेरल्या जातात, असा दावाही त्यांनी केला.

आंदोलनांचा भाजपवर परिणाम नाही!
गोव्यात सध्या सर्वत्र सरकारच्या विरोधात होणाऱ्या विविध आंदोलनांसंदर्भात तानावडे म्हणाले, ‘‘त्या आंदोलनांचा आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांच्या दृष्टीने भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण भाजपकडे स्वत:ची अशी ‘वोट बँक’ आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींवर जनतेच्या आशीर्वादाने भाजपाचीच सत्ता येईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तथापि, त्या आंदोलनांमुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये; जनतेला त्यासंदर्भात वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्यास त्याबाबत संबंधितांचा योग्य तो समाचार घेणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.’’

 

आम्हाला विचारल्याशिवाय तसे होणे शक्य नाही...
वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून ढवळीकर यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतल्यास आपली भूमिका काय असेल, असे विचारले असता तानावडे म्हणाले, की तसा प्रस्तावच नसल्याने ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेणार तरी कोण? केंद्रीय पातळीवर तसे प्रयत्न झाल्यास तेही शक्य नाही; कारण, आम्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारल्याविना केंद्रीय पातळीवरील नेते कोणताही निर्णय घेत नाहीत. स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेणे ही भाजपाची कार्यपद्धती आहे. कुणीही केंद्रीय नेत्यांशी थेट संपर्क साधला तरी ते नेते आम्हा आवर्जून त्या विषयावर विचारतातच. त्यामुळे ढवळीकरांना मंत्रिपद देणार ही निव्वळ अफवाच आहे.

ढवळीकरांना मंत्रिपद देणार ही वावडीच!
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सदानंद तानावडे म्हणाले, इतर पक्षांतील आमदारांना सरकारपक्षात आणण्याचा प्रयत्न होतोय या वृत्तातही कोणतेही तथ्य नाही. सुदिन ढवळीकर यांना भाजपात आणण्याचा प्रस्ताव पक्षासमोर आहे ही वावडीच आहे. त्यासंदर्भात कुणीही काहीबाही बोलत असतात. प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याशी अथवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशीही ढवळीकर यांची अजून तरी चर्चा झाली नाही. त्याबाबत आमच्या पक्षाकडे प्रस्तावही आलेला नाही, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या