सांगेवासीयांची वणवण थांबणार

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

२०१०-१२ कालावधीत जायकाचे बंद पडलेले काम आता पुन्‍हा सुरू करून जुनाट जलवाहिनी बदलून त्या जागी २५० मी.मी. व्यासाची घालण्याचा शुभारंभ सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांच्या हस्ते वालकिणी वसाहत क्र. तीनमध्ये करण्यात आला आहे. 

सांगे : साळावली धरणाचे सत्तर टक्के पाणी गोव्यात पुरवठा होऊन चोवीस तास उपलब्ध केले जात आहे. मात्र, सांगेतील पाणीपुरवठा नियोजन चुकीचे केल्याने बारा तासही पाणी मिळत नाही. यात आता बदल घडवीत २०१०-१२ कालावधीत जायकाचे बंद पडलेले काम आता पुन्‍हा सुरू करून जुनाट जलवाहिनी बदलून त्या जागी २५० मी.मी. व्यासाची घालण्याचा शुभारंभ सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांच्या हस्ते वालकिणी वसाहत क्र. तीनमध्ये करण्यात आला आहे. 

यावेळी आमदार प्रसाद गावकर म्हणाले वालकिणी येथे जलकुंभ बांधून ठेवला होता. त्यात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी १०० मि.मी. व्यासाची असल्याने पुढील भागात पाण्याची कमतरता भासत होती. त्यात आता बदल करून २५० मि.मी. व्यासाची जलवाहिनी घालण्याचे काम जायकातर्फे करण्यात येणार आहे. साळावली, दांडो, पोलिस स्टेशन मार्गे उगे तेथून एक जलवाहिनी वालकिणी भागात तर दुसरी वाहिनी काले भागात जाणार आहे. एकूण साडे पाच कि.मी. अंतराची जलवाहिनी द्वारे पाणी वालकिणी जलकुंभात तेथून व्हालशे जलकुंभात आणि तेथून वाडे कुर्डी विहिरीत सोडण्यात येणार आहे. साळावली धरणाचे पाणी प्रत्येक घरात पोहोचणे गरजेचे आहे. जायकाने पूर्वीचा कंत्राटदार बदलून नवीन कंत्राटदार नियुक्त केल्याने येत्या डिसेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस असून नव्या वर्षात पाणी पुरवठा होईल, अशी अपेक्षा आमदार गावकर यांनी  व्यक्त करण्यात आली. 

यावेळी सरपंच उदय नाईक, उपसरपंच आवडू गावकर, पंच महादेव गावकर, रुपेश गावकर, सुनील भंडारी, पुजारी विजेंद्र कृष्णा वेळीप, जायकाचे अभियंते प्रकाश यारनाल इतर ग्रामस्थ उपस्थित होते. 
सरपंच उदय नाईक म्हणाले की, गावात वीज पाणी कमी झाल्यास मतदार निवडणुकीत लोकप्रतिनिधीवर राग काढतात. परिणामी मतदान घटते पण वीज आणि पाणी पुरवठा करणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यातून  वाचतात. जलवाहिनी घालताना नाहक विरोध करू नका. एकट्याला त्रास होत असेल म्हणून सर्वाना फायदा होणारी कामे अडवून ठेवणे योग्य नव्हे. यासाठी हे काम लवकर होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या