कारागृहाचा तुरुंगरक्षक कोरोना बाधित 

dainik gomantak
गुरुवार, 9 जुलै 2020

वास्कोस्थित मात्र कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात सुरक्षिततेच काम करणारा तुरुंग रक्षक पोझिटिव्ह सापडल्याने त्याची त्वरित रवानगी कोविड निगराणी केंद्रात करण्यात आली. या कारोना बाधित कर्मचाऱ्याची काही दिवस कारागृहातील गुन्हेगार खोल्या असलेल्या ठिकाणी होती.

पणजी

राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असतानाच कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग रक्षक कोरोना बाधित सापडल्याने तुरुंगाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. हा तुरुंग रक्षक वास्को येथील असून त्याने गेल्‍या रविवारी (५ जुलै) कारागृहात आयोजित केलेल्या ओल्या पार्टीसाठी साहित्य आणले होते. या प्रकरणामुळे सुमारे पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांची कोविड - १९ चाचणी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात आज रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 
कारागृहात तुरुंग रक्षक असलेल्या या कर्मचाऱ्याचा भाऊ कोरोना बाधित रुग्ण असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या तुरुंग रक्षकालाही कोविड - १९ चाचणी करण्यास कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्याने केलेल्या चाचणीचा अहवाल आज आला व त्याची माहिती कारागृह प्रशासनाला देण्यात आल्यावर कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे तसेच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. कोरोना बाधित कर्मचारी कारागृहाच्या प्रवेशद्वार तसेच आतील भागातही सुरक्षेचे काम करत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात त्याचे सहकारी तुरुंग रक्षक तसेच आयआरबीचे सुरक्षा पोलिस तसेच अधिकारी आले होते. त्यामुळे कारागृहातील अधिकाऱ्यांनी आपली स्वतःची चाचणी केली. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांनी त्यांची चाचणी केली जावी अशी मागणी केली होती. कोणताही धोका न पत्करता कारागृह महानिरीक्षकांनी तेथील सर्व कर्मचाऱ्यांना चाचणी करण्यास सांगितले आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच किती कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे हे उघड होईल. 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कोरोना बाधित सापडलेल्या तुरुंग रक्षकाने गेल्या रविवारी (५ जुलै) कारागृहात आयोजित केलेल्या पार्टीला वास्को येथून आपल्या घरातून सामान आणले होते. त्याच्या घरातील भाऊच कोरोना बाधित होता तसेच हा कर्मचारी एकत्रित घरातच राहत होता. या पार्टीमध्ये कारागृहातील ड्युटीवरील तुरुंग रक्षक, आयआरबी सुरक्षा पोलिस तसेच कारागृहातील अधिकारी हे सामील झाले होते. वास्कोस्थित मात्र कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात सुरक्षिततेच काम करणारा तुरुंग रक्षक पोझिटिव्ह सापडल्याने त्याची त्वरित रवानगी कोविड निगराणी केंद्रात करण्यात आली. या कारोना बाधित कर्मचाऱ्याची काही दिवस कारागृहातील गुन्हेगार खोल्या असलेल्या ठिकाणी होती. त्यामुळे कारागृहातील आरोपींची व कच्चे कैद्यांची चाचणी करण्याबाबत निर्णय झाला नव्हता. या प्रकरणामुळे आरोपी व कैद्यांचीही चाचणी करण्याचा विचार पुढे आला आहे. 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मानक परिचालन सूचनांचे (एसओपी) उल्लंघन करून कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील अनेक कैदी तसेच कारागृह अधिकारी तोंडाला मास्क लावत नाही तसेच सामाजिक अंतरही पाळले जात नाही. या कारागृहातील अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून वरिष्ठ अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कारागृहाचा तुरुंग रक्षक कोरोना बाधित सापडल्याने अग्निशमन दलाच्या बंबमधून कारागृहातील भाग निर्जंतुकीकरण करण्यात आला. मात्र कैद्यांना ठेवणाऱ्या खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले नाही. 
 

goa goa goa 

संबंधित बातम्या