म्हापशातील जामा मशिदीच्या सभेत गोंधळ

सभा बरखास्त : बेकायदा नव्या सदस्यांच्या नोंदणीला एका गटाचा विरोध
म्हापशातील जामा मशिदीच्या सभेत गोंधळ
Jama Masjid meetingDainik Gomantak

म्हापसा : बेकायदेशीरपणे नवीन सदस्यांची नोंदणी करून, त्यांना सभेत प्रवेश दिल्याच्या कथित आरोपावरून एका विरोधी गटाने रविवारी आंगड-म्हापसा येथील जामा मशिदीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ घातला. परिणामी, सभास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने अखेर दंडाधिकाऱ्याच्या सूचनेनंतर आयोजक कमिटीला ही सभा अखेर बरखास्त करावी लागली. सुमारे दोन तास हा गदारोळ चालला.

Jama Masjid meeting
बनावट व्हॉट्‌सअप खात्यापासून सावध राहा!

विरोधी गटाचे नेतृत्व करणारे फिरोज खान यांनी आपल्या इतर सदस्यांसोबत सभास्थळी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आयोजकांनी त्यांना सभागृहात प्रवेश नाकारला. कारण, कमिटीने फिरोज खान यांची सदस्यत्व निष्कासित केले आहे. तसेच त्यांचे इतर सहकारी जे गोंधळ घालताहेत, ते या कमिटीचे सदस्य नाहीत, असा मशीद कमिटीचा दावा होता. त्यामुळे या दोन्ही गटांत वाद उफाळला व सभागृहाबाहेर वातावरण तंग बनले होते.

म्हापसा पोलिसांतर्फे उपनिरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक विराज कोरगांवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, याची काळजी घेतली. बराचवेळ हा तणाव निर्माण झाल्याने नंतर मामलेदार वर्षा परब यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थितीची माहिती दिली. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, आयोजक कमिटीने ही सभा कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव बरखास्त करीत असल्याचे जाहीर केले.

Jama Masjid meeting
मोफत ई-व्‍हिसा मुदत 2024 पर्यंत वाढवा ; टीटीएजीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

जामा मशीदीचे अध्यक्ष कटवेलिया म्हणाले, आमची सर्वसाधारण सभा नोंदणीकृत सदस्यांसोबत शांततेत सुरू होती. मात्र, कमिटीचे सदस्य नसताना काही असंतुष्ट लोकांनी या ठिकाणी येऊन गोंधळ घातला. सामान्य श्रेणीत आलेल्या अर्जांची छाननीनंतर या नवीन युवकांना जामा मशीद कमिटीचे सदस्यत्व दिले. त्यात कथित रक्त संबंध सदस्यत्व असा प्रकार नाही. शिवाय कुणाला सदस्य करावे, याचे अधिकारही व्यवस्थापकीय समितीकडे असतात, असेही या जामा मशीदीचे अध्यक्ष फिरोज कटवेलिया म्हणाले.

फिरोज खान म्हणाले, मी कमिटीचा सदस्य असताना मला सभेत प्रवेश नाकारला. हे चुकाची होते. मला या कमिटीतून निष्कासित केल्याचे आज तीन वर्षानंतर सांगण्यात आले. परंतु, असे करताना मला कुठलीच नोटीस दिली नव्हती किंवा काहीही सांगितले नाही. मूळात मशिदीच्या कमिटी संविधानात रक्त संबंध सदस्यत्व देण्याची तरतूद नाही. तरी बेकायदेशीरपणे सुमारे शंभरजणांना नवीन सदस्यत्व दिल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, आमच्या गटातील मुलांचे सदस्यत्व अर्ज डावलल्याचाही आरोपही त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com