जनमन उत्सव: प्राथमिक शिक्षणात गोव्यातील मातांचे योगदान

मुलांच्या वैचारिक जडणघडणीसाठी लौकिक शिक्षणाबरोबरच हवे नैतिक शिक्षण
जनमन उत्सव: प्राथमिक शिक्षणात गोव्यातील मातांचे योगदान
जनमन उत्सवDainik Gomantak

सानेगुरूजींनी आईबद्दल लिहिलेल्या या ओळी! जीवनातील कोणताही विषय घेतला तरी तो आईपासूनच सुरू होतो आणि आईपाशीच संपतो. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याच्या आईचा एक विशिष्ट वाटा असतो. मुलाची जडणघडण, चांगले-वाईट गुण, कौशल्ये... हे सर्वच आईवर अवलंबून असते. आई स्वत:च्या मुलाला कशा प्रकारे वाढवते त्यावरच त्या मुलाचे भवितव्य ठरत असते. मुलांच्‍या आयुष्यात कितीही उत्तम शिक्षक, गुरू आले तरी सुरवातीच्या काळात आईने त्या मुलाला काय शिकवले त्यावरच त्‍या मुलाची प्रगती-अधोगती ठरलेली असते. आईला मुलांचा पहिला गुरू मानतात ते त्याचमुळे!

शिवरायांचे चरित्र बघितले तर याची प्रचीती नक्कीच येईल. राजमाता जिजाऊंनी एक आई म्हणून शिवबांची चांगल्या प्रकारे जडण-घडण केली. त्यामुळेच स्वराज्य उभे राहिले. म्हणूनच आईच्या रूपातील उत्तम गुरू म्हणजे ‘जिजाऊ’. जगातील समस्त मातांनी जिजाऊंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर नक्कीच घराघरात शिवबा तयार होईल. पुढची पिढी शिवबासारखी बनवायची की अफजलखान या सैतानासारखी हे प्रत्येक मातेच्याच हाती आहे आणि म्हणूनच मुलांच्या शिक्षणात, खास करून पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तराच्या शिक्षणात आईची सर्वाधिक मोठी भूमिका आहे.

जनमन उत्सव
जनमन उत्सव सर्वेक्षणात चिखली-वास्कोतील महिलांचा सहभाग

खरे तर पूर्वप्राथमिक शाळा किंवा शिशुवाटिका ही भारतीय संकल्पना नाहीच. कारण, भारतीय शिक्षणानुसार सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचे शिक्षण हे अनौपचारिक शिक्षण आणि ते अनौपचारिकपणेच व्हावयास हवे. म्हणून ते शिक्षण घरीच व्हावे अशी संकल्पना. परंतु, कालपरत्वे ते अनौपचारिक शिक्षणही आता औपचारिक होऊ लागले आहे. त्यापुढील टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षण. आपणांपैकी बहुतेकांना असे वाटते, की एकदा का मुलांना शाळेत घातले की आपली जबाबदारी संपली. पण, ते तितके सोपे नाही. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे आई जे शिकवते, तेच मुलांच्‍या मनांवर आधीच ठामपणे कोरलेले असते. त्‍यामुळे आई मुलांच्‍या मनांवर काय कोरते ते फार महत्त्वाचे आहे. प्राथमिक शिक्षणाचे वय म्हणजे वय वर्षे सहा ते दहा वर्षे. जो काळ मुले सर्वांत जास्त काळ आईजवळच असतात आणि तेच अपेक्षित आहे. शाळेचा अभ्यास आईनेच घ्यायचा, शाळेच्या बाईने नाही, असा त्याचा अर्थ नाही. शाळेतले विषय बाई शिकवतीलच; पण, त्या विषयांपेक्षा वेगळे आणि महत्त्वाचे असे बरेच काही आहे, जे आईने मुलांना शिकवणे गरजेचे आहे.

वागावे कसे, बोलावे कसे, स्वावलंबन, स्वच्छता, मोठ्यांचा आदर राखणे, हट्ट न करणे, नेमून दिलेले काम करणे, धीटपणा, सोशीकता, आपले संस्कार, कुलाचार, श्लोक, स्तोत्र, पूर्वजांच्या कथा, धर्माविषयी ज्ञान अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मुलांना याच वयात म्हणजे सहा ते दहा वर्षांपर्यंत शिकवायला हव्यात. ज्‍या आईव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती प्रभावीपणे शिकवू शकत नाही. या सर्व गोष्टी मुलांना कशा शिकवायच्या हा प्रश्न कदाचित आजच्या पिढीतल्या आयांना पडेल.

जनमन उत्सव
जनमन उत्सव: महिलांमध्ये आरोग्य जागृती हवी

पूर्वी आई आपल्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून, गाणी गाऊन खूप काही ज्ञान अनवधानाने देत असत. त्यात राम-कृष्णाच्‍या कथा, हनुमानाच्‍या कथा, भक्त प्रल्हाद, ध्रुव, गणपतीबाप्पा अशा पौराणिक कथा असत. पण त्‍या कथांमधून जवळजवळ सर्व सद्‍गुण आई मुलांना शिकवत असे. रोज सकाळी ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ पासून सायंकाळच्या ‘शुभं करोती’ पर्यंत पूर्णवेळ मुले आईच्या बरोबर असायची आणि आपोआपच सद्‍गुण, सदाचार शिकायची. परंतु आताच्‍या आया कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतात. स्वत:च्या मुलांपासून त्या दूर असतात. अशा वेळी कोवळ्या वयातील त्या मुलांच्‍या नीतिशिक्षणाच्या बाबतीत गंभीर प्रश्न उभा राहतो. सगळ्याच गोष्टी शाळेत शिकवता येणे शक्य नाहीत. त्‍यासाठी प्रत्येक आईने थोडे कष्ट घेतलेच पाहिजेत. आपल्या व्यस्त वेळेतून स्वत:च्या मुलांसाठी, आपल्या भावी पिढीसाठी आवश्यक त्‍या बाबी केल्याच पाहिजेत.

आईच घडवते मुलांना...

वेळ नाही, जमत नाही ही कारणे जर आईने दिली तर तिचीच पुढची पिढी वाममार्गाला लागेल हे प्रत्येक आईने ध्यानात ठेवायला हवे. एकदा का मुलांचे ते वय उलटले की मग कितीही खटाटोप करा, त्यात सुधारणा होणार नाही. एकदा का मुले मोठी झाली की त्यांचे स्वत:चे भावविश्व निर्माण व्हायला लागते. तसे होण्याआधी जर मुलांना वैचारिक अधिष्ठान नसेल तर मुले भरकटत जातात. म्हणूनच सहा ते दहा वर्षे हा काळ मुलांच्या वैचारिक जडणघडणीसाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्याला सद्‍गुणी, सदाचारी पिढी हवी असल्यास त्यांच्‍या प्राथमिक स्तराच्या वयातच त्यांच्या मनांवर, बुद्धीवर एक उत्तम ठसा उमटवला पाहिजे, ज्याची जबाबदारी आईवरच आहे.

लौकिक शिक्षणाबरोबरच हवे नैतिक शिक्षण

आताची पिढी बौद्धिकदृष्ट्या खूप हुशार आहे. त्यामुळे लौकिक शिक्षण उत्तमरीत्या घेतीलच. पण त्याला नैतिकतेची जोड नसेल तर त्या उच्च शिक्षणाला काय अर्थ? राष्ट्रनिर्मितीसाठी उच्च शिक्षणाबरोबर नैतिकतेची गरज आहे आणि ती जबाबदारी ‘आई’ या व्यक्तीवर आहे. त्यामुळे, प्रत्येक मातेने प्राथमिक स्तरावर असलेल्‍या स्वत:च्या मुलांच्या नैतिक शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.

ॲड. रोशन रवींद्र सामंत शिशुवाटिका प्रमुख, ‘विद्याभारती, गोवा’

Related Stories

No stories found.