जनमन उत्सव: आदर्श पिढी आणि समाज घडवूया

जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा यासाठी मुलांना ‘काऊंसिलिंग क्लासेस’ सुरू करण्याची आज गरज आहे.
जनमन उत्सव: आदर्श पिढी आणि समाज घडवूया
Janman Utsav: Let's create an ideal generation and societyDainik Gomantak

जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा यासाठी मुलांना ‘काऊंसिलिंग क्लासेस’ सुरू करण्याची आज गरज आहे. पूर्वजांनी म्हटलेच आहे, ‘टीचर इज अ सेकंड मदर.’ शिक्षिका ही विद्यार्थ्याची दुसरी आई असते. त्यामुळे बालमनाला आकार अशाप्रकारे देता येणे शक्य आहे.

पल्या आदर्श नीतीमुल्यांची जपणूक आपण करायला हवी. आम्हाला वडीलधाऱ्यांनी जे काही चांगले शिकविले, ज्या ज्या गोष्टी आमच्याकडून आयुष्य घडवण्यासाठी करून घेतल्या त्या-त्या आम्ही आमच्या मुलांकडून करून घेणे अपेक्षित आहे. यातून मुले धीट बनतील, त्यांना शिस्तीचे महत्त्व कळेल. हे सगळे आपल्या मुलांसाठी, त्यांच्या सुरक्षित भल्यासाठी आणि सशक्त समाजासाठी आवश्‍यकच आहे. प्रत्येक मातेला हे नक्कीच आवडेल. त्यासाठी सरकारपासून इतर सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करायला हवे. निरपेक्ष भावनेने कोणतेही काम केल्यास त्याची फळे चांगली मिळतात. गोव्याला आणखी काय हवे..?

गोव्यातील प्रत्येक मातेला गोवा कसा हवा, तिच्या काय अपेक्षा आहेत, या विषयावर मत व्यक्त करताना, गोव्याकडून म्हणजे कोणाकडून? याचा विचार केला तर आपले सरकार, विविध सरकारी खाती, कित्येक सामाजिक संस्था, उदार वृत्तीची व्यक्तिमत्त्वे यांच्याकडून हे अपेक्षित आहे, असाच त्यातून अर्थ काढता येतो. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी हा असा प्रश्‍न उद्‍भवला नव्हता. कारण त्यावेळी प्रत्येक माता सर्वच दृष्टीने निश्‍चिंत होती. मुख्य म्हणजे तिची मुले, तिचा नवरा आणि तिचा सुखी संसार हेच तर त्या-त्या मातेचे परिपूर्ण असे विश्‍व असते.

आपल्या या परिवाराची सुरक्षितता ही तिची पहिली काळजी असते. आपल्या मुलांमध्ये संस्कार शिदोरी रुजविणे हा तिचा रोजचाच अजेंडा असतो. असह्य अशा प्रसुतीवेदना सहन करत आई जेव्हा बाळाला जन्म देते, तेव्हा मनुष्यनिर्मितीचे एक सुवर्णभाग्य निसर्ग तिला प्रदान करत असतो. मग पुढे या अर्भकाला वाढवताना ती आपले हदयच त्याला बहाल करत असते. अगदी त्याच्या जन्मापासून ते तिच्या स्वतःच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्या या बाळाची चिंता ती करत असते. लग्न झालेल्या प्रत्येक बाईचं पुढचं आयुष्य म्हणजेच प्रामुख्याने तिची बाळं आणि तिचा नवरा हेच असते. दुदैवाने आजची माता मात्र वेगवेगळ्या दृष्टचक्रांत सापडली आहे. आपल्या गोव्यात अलिकडे मुलांवरील अत्याचार वाढत आहेत. सकाळी घरातून बाहेर गेलेले आपले मूल परत सुरक्षितपणे घरी येणार की नाही याची घोर अशी चिंता प्रत्येक मातेला लागलेली दिसून येते. अलिकडेच सिध्दी नाईक या मुलीचा मृतदेह कळंगुट समुद्र किनाऱ्यावर आढळला. गोव्यातील सर्वच मातांचे हदय या गोष्टीने थरथरायला लागले. आपल्या मनाला क्लेश देणाऱ्या अशा बातम्या आपण आता रोजच वाचतो. अपघात, आत्महत्या, बलात्कार, खून, मारामारी, दरोडे, अपहरण वगैरे गोष्टींना अलीकडे कित्येक मुले-मुली बळी पडत आहेत.

कुटुंब नियोजनाचे कडक पालन केल्याने प्रत्येक घरी आताच्या काळात एक, दोनच मुले असतात. त्यांचीच जर वरील गोष्टींमुळे वाट लागली तर प्रत्येक माता उद्‍ध्वस्त होईलच ना! आताच्या काही मुलांना लागलेली पैशांची चटक आणि त्यातून वाढत चाललेली व्यसनाधीनता, स्वैराचार हा तर प्रत्येक मातेला भेडसावणारा कॅन्सरसारखा एक भयानक रोगच आहे जणू. अशावेळी इथल्या प्रत्येक मातेला वाटते, आपली मुले सुरक्षित असावीत. पोलिस खाते सक्षम हवे. गुन्हेगारांवर कारवाई करणारे हवे. अलीकडेच एका पार्लरवर छापा टाकून तेथील कित्येक तरुणींना वेश्‍याव्यवसायात गुंतल्या प्रकरणी अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलींनाही गैरधंद्यात अडकवणे हा किती भयानक प्रकार. असे प्रकार रोखायला हवेत. अलीकडे वाचनात येते की आठवी-दहावीतील मुलेही बिअर पितात. पालकांना आपल्या मुलांबाबत काळजी वाटू लागली की मग मुलांवर लक्ष ठेवले जाते. ती बिथरतात. पण मुले सुसंस्कारीत असावीत, असे प्रत्येकाला वाटते. तसा सुसंस्कृतपणा समाजात असायला हवा.

शिक्षक आणि एकूणच शालेय संस्थानी फार दक्ष राहावे लागणार आहे. पालक शाळेवर विश्‍वास ठेवून मुलांना तिकडे पाठवतात. त्यामुळे शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांचीही जबाबदारी वाढली आहे. तशी मानसिकता घडायला हवी.

एकदा मी दूरदर्शनवर ‘टॉक शो’ केला. विविध कॉलेज युवतींना त्यात आमंत्रित केले होते. विषय होता चंगळवाद-भोगवादात अडकलेली मुले-मुली! आजच्या अगदी कोवळ्या बालिकाही अशा विचलित होऊन ‘चंचला’ का बनल्या आहेत? असा एक प्रश्‍न मी विचारला असता, एका मुलीने उत्तर दिले ‘आम्हाला खूप पैसा हवा असतो. घरची कटकट करतात पैसे द्यायला, मग आम्ही पैसे देणाऱ्या मुलांबरोबर ‘डेटिंग’ करतो आणि चिक्कार पैसे मिळवितो.’ मी दुसरा प्रश्‍न विचारला, पण तुम्ही हे असे कुठून शिकलात? लगेच दुसरीने सरळ उत्तर दिले ‘टीव्ही सिरीयलमधून...’

ही सारी बेताल उत्तरे ऐकून धक्का बसला. का घडतेय असे? अशा विचार करण्याच्या वृत्तीने इथली प्रत्येक माता मानसिक वेदनेने विव्हळत असेल. सरकार, महिला आणि बालकल्याण खात्याने अशा टिव्ही मालिका, ज्या बालमनावर परिणाम करतात, त्यावर निर्बंध आणायला हवेत. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असावा यासाठी मुलांना ‘काऊंसिलिंग क्लासेस सुरू करण्याची आज गरज आहे. पूर्वजांनी म्हटलेच आहे, ‘टीचर इज अ सेकंड मदर.’ शिक्षिका ही विद्यार्थ्याची दुसरी आई असते. त्यामुळे बालमनाला आकार अशाप्रकारे देता येणे शक्य आहे. माणसाला घडवणारी भारतीय संस्कृती सोडून माणसाला बिघडवणारी संस्कृती आपण आमच्यात भिनवली जात आहे की आपण अशा संस्कृतीच्या आहारी जात आहोत? ‘पुरुषांनी मैत्रिणी केल्या तर चालतात, मग स्त्रियांनी का बरे मित्र करू नयेत? असे प्रश्‍न निर्माण होत राहिले आणि ‘स्वच्छंदी’ जीवनाचा अर्थ बदलत गेला. त्याचा परणिाम फार वाईट होताना आपण अनुभवत आहोत. माणसाला माणुसकी शिकविणारी आमची आद्य शिक्षणपध्दती हरवत चालली आहे ती पुन्हा सुरू व्हायला हवी. गोव्यात निसर्गरम्य समुद्र किनारे, धबधबे, तलाव-तळी आहेत. त्या ठिकाणी पिकनिकच्या नावाखाली जो बाहेरख्यालीपणा, हुल्लडबाजी चालते ती बंद व्हायला हवी. मस्ती करायला हवी, पण त्यातून कोणाचे नुकसान होऊ नये. उलट आनंद मिळावा, उत्साह वाढावा. त्यासाठी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे हा काही पर्याय असू शकत नाही. काहीबाही केल्याने आपत्ती ओढवते त्यावेळी मुला-मुलींच्या मातेचे आक्रोश पाहता येत नाहीत.

Related Stories

No stories found.