अनेक अडचणींनंतरही ‘जीत’ ; आरोलकरांचा मगोत प्रवेश

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

विधानसभेच्या मांद्रे मतदारसंघातून अपक्ष लढून तब्‍बल साडेनऊ हजार मते घेणाऱ्या जीत आरोलकर यांनी मगोमध्ये प्रवेश घेऊ नये, यासाठी सारे प्रयत्न ‘सरकारी आशीर्वादा’ने आज करण्यात आले. त्यांच्‍या मांद्रेतील सभेला सरकारी यंत्रणेने ऐनवेळी परवानगी नाकारली.

मोरजी  : विधानसभेच्या मांद्रे मतदारसंघातून अपक्ष लढून तब्‍बल साडेनऊ हजार मते घेणाऱ्या जीत आरोलकर यांनी मगोमध्ये प्रवेश घेऊ नये, यासाठी सारे प्रयत्न ‘सरकारी आशीर्वादा’ने आज करण्यात आले. त्यांच्‍या मांद्रेतील सभेला सरकारी यंत्रणेने ऐनवेळी परवानगी नाकारली. अखेर मांद्रेतील रस्त्यावरच मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी आरोलकर यांना व त्यांच्या समर्थकांना मगोत प्रवेश दिला. सरकारने ऐनवेळी कार्यक्रमाला परवानगी न दिल्‍यामुळे लोकांकडून नाराजी व्‍यक्त करण्‍यात आली.

मांद्रेतून एकेकाळी गोव्याचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर विधानसभेत जायचे. त्यांच्या निधनानंतर सलगपणे मगोच्याच उमेदवारीवर ॲड. रमाकांत खलप निवडून येत असत. मगोचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात मगोचे सहानभुतीदार कट्टर मतदार अनेक आहेत. त्यामुळे आरोलकर यांनी मगोत प्रवेश केल्यास राजकीय समीकरणे कमालीची बदलू शकतात याचा अंदाज सत्ताधाऱ्यांना आला होता. त्यामुळे चार वर्षे जुन्या दिवाणी खटल्यात गुन्हा नोंदवून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्याला दाद न दिल्याने त्यांच्या सभेलाच अखेरच्या क्षणी परवानगी नाकारण्यात आली. ती नाकारण्याचे पत्र देण्यापूर्वीच पोलिसांनी सभेच्या ठिकाणी जमलेल्यांना पांगवण्याचे काम केले, तरीही शेकडे समर्थक त्या परिसरात राहिले त्यांच्याच साक्षीने जीत आरोलकर यांनी मगोत प्रवेश केला.

गोव्यात इमर्जन्सी आली का?
मगो पक्ष प्रवेशाला परवानगी नाकारणे म्हणजे गोव्यात इमर्जन्‍सी लागू केली की काय? असा सवाल उपस्थित केला. तशी असती तर नरकासुराला सरकारने परवानगी कशी दिली. हजारो नागरिक उपस्थित झाले, त्यांच्यावर उत्तर गोवा किंवा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांनी कोणतीच कारवाई कशी केली नाही. २०० लोकांचा कार्यक्रम होता तो पोलिसांनी उधळून लावला. परवानगी का नाकारली यासाठी आपण उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारले तर कार्यकर्त्यांच्‍या  नावाचा उल्लेख नसल्याने ही परवानगी नाकारल्याचे सांगितले. ही कृती योग्य नसल्याचे ढवळीकर म्हणाले. सरकारने लोकशाहीचा खून केला, असेही ढवळीकर म्‍हणाले.

संबंधित बातम्या