जेनेटो कार्दोजची खंडपीठात धाव

विलास महाडिक
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरण, सोमवारी सुनावणी

पणजी

सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेनेटो कादोज याला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर व पोलिसांनी त्याचा शोधाशोध सुरू केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. त्याच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी येत्या सोमवारी (१० ऑगस्ट) ठेवण्यात आली आहे.
सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी याच्या घरावर अर्जदार तथा संशयिताच्या इशाऱ्यावरून गुन्हेगारी टोळीने हल्ला केला असा आरोप आहे. या टोळीयुद्धावेळी त्याच्याच टोळीतील एकाचा पिस्तुलची गोळी लागून मृत्यू झाला होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व खुनाच्या आरोपाखाली दोन वेगळे गुन्हे नोंद केले आहेत. या घटनेनंतर अर्जदार जेनेटो कार्दोज याने साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचे अपहरण करून धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा गुन्हा पणजी पोलिस स्थानकात नोंद आहे. पणजी पोलिसही त्याच्या शोधात आहेत.
जुने गोवे पोलिसांनीही त्याच्याविरुद्ध त्याच्या साथीदारानी दिलेल्या जबानीत अनेक पुरावे गोळा केले आहेत व त्याच्या शहानिशा करण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची तसेच त्याच्याविरुद्ध अनेक पोलिस स्थानकात गुन्हे नोंद आहेत त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन न देण्याचा युक्तिवाद सत्र न्यायालयात झाला होता त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार अर्जदार तथा संशयिताचे पोलिस खात्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याने तो अजूनही सापडत नाही. पोलिसांच्या हालचाली या त्याच्यापर्यंत पोहचत असल्याने त्याला दडून राहण्यास मदत होत आहे. सध्या तो गोव्यात आहे की नाही याचाही पत्ता पोलिसांना नाही. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीवेळी पोलिसांनी न्यायालयाला निर्णय देताना त्याला उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत यासाठीही प्रयत्न केलेले नाहीत.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या