गोवा राष्ट्रीय स्तरावर कसा पोहोचेल, यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

राज्यातील स्थानिक प्रश्‍नांवर पत्रकारांनी जरूर प्रकाश टाकावा. परंतु पर्यटनावर, पर्यावरण आणि व्यवसायाशी संबंधित वृत्तातून टीका झाल्यास त्याची गोवा हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचे ठिकाण असल्याने लगेच दखल घेतली जाते, हे राज्याची प्रतिमेसाठी ते घातक ठरते.

पणजी: राज्यातील स्थानिक प्रश्‍नांवर पत्रकारांनी जरूर प्रकाश टाकावा. परंतु पर्यटनावर, पर्यावरण आणि व्यवसायाशी संबंधित वृत्तातून टीका झाल्यास त्याची गोवा हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचे ठिकाण असल्याने लगेच दखल घेतली जाते, हे राज्याची प्रतिमेसाठी ते घातक ठरते. त्यामुळे कृपया या तिन्ही विषयांवर पत्रकारांनी लिहिताना सर्व बाजू समजून घेऊन पारदर्शकपणे लिहावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज केले. 

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त माहिती व प्रसार खात्याच्यावतीने मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माहिती व प्रसार खात्याचे सचिव संजय कुमार, संचालक सुधीर केरकर, गोवा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी गोवा एडिटर गिल्ड, इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नालिस्ट असोसिएशन, स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन, दक्षिण गोवा जर्नालिस्ट असोसिएशन आणि फोटो जर्नालिस्ट असोसिएशन यांनी सहकार्य केले. यावर्षी ज्येष्ठ पत्रकार सिताराम टेंगसे यांना जीवनगौरव पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्य सरकार पर्यटनवृद्धीसाठी भरपूर पैसा खर्च करते. परंतु पत्रकार दिनाच्यानिमित्ताने गोवा राष्ट्रीय स्तरावर कसा पोहोचेल, यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. गुजचे अध्यक्ष नाईक यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड-१९ मुळे अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांना वयाच्या अटीनुसार कशी मदत करता येईल, याविषयी नक्कीच सरकार विचार करेल. आत्मनिर्भर भारत बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे गोव्यात ३५ योजना राबविल्या जात असून, येत्या काळात उर्वरित योजनाही मार्गी लागतील असे आश्‍वासन त्यांनी दिले. गोवा मुक्त होऊन ६० वर्षे झाली तरी मूळ गोवेकर आजही योजनांपासून वंचित आहे, त्या घटकापर्यंत या योजना पोहोचविण्याच्या कामात पत्रकारांनीही हातभार लावावा, असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी सत्कारमूर्तींच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार विल्फ्रेड परैरा यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुरेश वाडावडेकर, सोयरू कोमरपंत, अनंत साळकर आणि सुरेश नाईक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

याप्रसंगी पत्रकार परेश प्रभू, महेश गावकर, प्रसाद शेट काणकोणकर, सिद्धार्थ कांबळे, मार्कुस मेरगुल्हो, घणेश शेटकर, राजतिलक नाईक यांना राज्यस्तरीय पत्रकारितेचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट छायाचित्रणासाठी खुल्या वर्गात राजतिलक नाईक, नारायण पिसुर्लेकर, मयूर नाईक, शुभम नेवगी, अरुण भट्टाचार्य, शैलेंद्र नाईक, स्वप्नेश तवडकर आणि गणेश शेटकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
 

संबंधित बातम्या