२५ जूनची निवडणूक बेकायदेशीर 

dainik gomantak
बुधवार, 24 जून 2020

भारतीय भाषा सुरक्षा मंच स्थापनेमुळे मागील निवडणुकीत भाजपला २१ आमदारांवरून १३ आमदारावर घसरण झाली व त्याला मीच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून ही सतावणूक सुरू आहे.

पणजी

प्रबोधन शिक्षण संस्था व हेडगेवार संस्थेवरून हटविण्यासाठी भाजप सरकारने माझी अनेक बदनामी करण्याचे सुरू केलेले प्रयत्न अजूनही सुरू आहेत. येत्या २५ जूनला संस्थेच्या प्रबोधन शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीची निवडणूक बोलावण्यात आली आहे ती बेकायदेशीर आहे. त्यामुळे संस्थेमध्ये राजकारण येऊ नये व ही संस्था राजकारणमुक्त राहावी असे मत असणाऱ्यांनी योग्य तो विचार करून मतदानास उपस्थित राहू नये असे आवाहन प्रबोधन शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे. 
प्रबोधन शिक्षण संस्थेची सर्वसाधारण सभा घेऊन निवडणूक घेण्यासाठी योग्य ती प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश उत्तर गोवा निबंधक यांनी दिला आहे व त्यानुसार येत्या १२ जुलैला निवडणूक निश्‍चित करण्यात आली असून समितीच्या सदस्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सध्या समितीचे ३२ पैकी ३० सदस्यच उरले आहेत. आता पर्रीकर नाहीत व निवडणुकीत मी सुद्धा उतरणार नाही त्यामुळे या संस्थेच्या भवितव्यासाठी व त्यात  राजकारण येऊन नये यासाठी शैक्षणिक क्षेत्राशी चांगला अनुभव व निःस्वार्थ सदस्यांना निवडून द्यावे. या निवडणुकीला उपस्थिती लावण्यासाठी समितीतील काहींना धमक्या दिल्या जात आहेत. भारतीय भाषा सुरक्षा मंच स्थापनेमुळे मागील निवडणुकीत भाजपला २१ आमदारांवरून १३ आमदारावर घसरण झाली व त्याला मीच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून ही सतावणूक सुरू आहे. समितीतील काही सदस्य फोडण्याचा प्रयत्नही भाजप कार्यालयातून केला जात आहे त्याचा मी निषेध करतो. समिती सध्या अस्तित्वात असताना ती नसल्याचे नमूद करून निबंधक महानिरीक्षकांनी ही निवडणूक बोलावून नोटिसा पाठविल्या आहेत. भाजप सरकार फोडाफोडीचे प्रकार करण्यात तरबेज आहे. आमचा न्यायसंस्थेवर विश्‍वास असून त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रक्रिया करत आहोत असे वेलिंगकर म्हणाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर भाटे व सूर्यकांत गावस उपस्थित केले. 
प्रबोधन शिक्षण संस्थेत कधी राजकारण आणू दिले नाही व राजकारणाशी संबंधित कोणतीही बैठकही या संस्थेमध्ये घेण्यास कधीही भाजपला परवानगी देण्यात आली नाही. १९८८ साली ही संस्था स्थापन झाली  तेव्हापासून ती २०१६ पर्यंत सुरळीत चालत होती. मात्र या संस्थेत भाजप नेत्यांनी व्यवस्थापकीय समितीवर येण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री पर्रीकर व पार्सेकर तसेच इतर नेत्यांनी कारस्थान घडवून आणले. केंद्रीय संरक्षणमंत्री असताना पर्रीकर यांनी समितीतील काही सदस्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर दबाव आणून सह्या घेतल्या व त्यांची फसवणूक केली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माझ्या व संस्थेविरुद्ध कटकारस्थान व सूडबुद्धीने अनेक निर्णय घेतले. सध्याचे भाजप सरकारही तीच पद्धत अवलंबून प्रबोधन शिक्षण संस्थेत राजकारण आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रा. वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 
माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी भाषा माध्यम तसेच अनुदान देण्यावरून मतभेद झाल्याने भारतीय भाषा सुरक्षा मंच स्थापन करून आंदोलन सुरू केले. तेव्हापासून पर्रीकर यांनी मला विद्या प्रबोधिनीवरून हटविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांनी वैयक्तिक सूड उगवण्यास
सुरुवात केली. सरकारी यंत्रणेला वेठीस धरून कटकारस्थान संस्थेविरुद्ध केले जात आहे, असे ते म्हणाले. 

भाजपने प्रबोधन शिक्षण संस्थेत लक्ष घालण्यास २०१६ साली सुरुवात केली तेव्हापासून मी संस्थेवरून उतरण्याची तयारी सुरू केली होती मात्र काही समितीतील आग्रहामुळे मी संस्थेवर राहिलो. संस्थेच्या सचिव पदावर चिकटून राहण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही.
यावेळी मी निवडणूक रिंगणातही उतरणार नाही हे भाजपला माहिती नसेल. त्यामुळे तर ते मला संस्थेच्या समितीवरून हटविण्यासाठी ही बेकायदेशीरपणे प्रयत्न सुरू केले आहेत असा टोला प्रा. वेलिंगकर यांना हाणला.

 

संबंधित बातम्या