कुडचडे मार्केटमध्ये जूनपासून मासळी विक्री

कुडचडे मार्केटमध्ये जूनपासून मासळी विक्री
fish

कुडचडे

कुडचडे येथील पालिकेचे मासळी मार्केट एक जूनपासून पुन्‍हा गजबजू लागणार आहे. कोरोना संचारबंदीमुळे मासळी मार्केट बंद करण्यात आले होते. त्यानंतर संचारबंदीत शिथिलता केल्यानंतर मासे विक्रेते जागा मिळेल तेथे मासळी विक्री करीत आहेत. पण, आता १ जून पासून पालिका मार्केटमध्ये बसून मासळी विक्री करण्यास द्यावी, असा निर्णय पालिका बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर खुल्या जागेत भाजी विक्री करणाऱ्यांनीही १ जून पासून सूडा मार्केटमध्ये बसून विक्री करायची आहे. ज्यांनी अद्याप विक्री परवाना घेतलेला नाही त्यांनी पालिकेकडून परवाना घेऊन आपला व्यवसाय सुरू करावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी दिली.
कुडचडे पालिका मंडळाच्‍या बैठकीला वीजमंत्री नीलेश काब्राल, पालिकाधिकारी अजय गावडे, नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, उपनगराध्यक्ष पिएदाद दिनीज, पालिका अभियंता दीपक देसाई व इतर नगरसेवक उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने या बैठकीत घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी यापूर्वी आकारण्यात येत असलेले शुल्क कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन कचरा गोळा करण्याचा दर लागू केल्यास तो नागरिकांना अडचण होणार असल्याने जुना दर कायम ठेवला आहे. पालिकाधिकारी अजय गावडे म्हणाले की, कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक घराप्रमाणे दरदिवशी एक रुपया आकारला जात असून घरपट्टी भरतेवेळी व इतर कार्यालयीन कामासाठी येणारे नागरीक व्यवस्थितरीत्या कचरा शुल्क भरत असल्याचे सांगितले.
तसेच पालिका बैठकीत राज्याबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन व्‍हावे हा सरकारचा निर्णय चुकीचा असल्यामुळे स्थानिकांच्‍या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रश्नावर वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बोलून सरकारने लोकहित लक्षात घेऊन निर्णयात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बैठकीत घेतलेल्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com