जीवन सुखकर करा, अपघात टाळा, केवळ पिन करा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे किंवा इतर धोके पिनइट या ॲपवर पिन करा. असे  केल्यानंतर हे ॲप वापरणाऱ्या इतरांनाही ती माहिती मिळेल, जेणेकरून पुढील अपघात टळेल.

पणजी: एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आता आपल्याला माहिती असणाऱ्या समस्यांच्या मध्यमातून इतरांचे जीवन सुखकर करता येणार आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे किंवा इतर धोके पिनइट या ॲपवर पिन करा. असे  केल्यानंतर हे ॲप वापरणाऱ्या इतरांनाही ती माहिती मिळेल, जेणेकरून पुढील अपघात टळेल. हे ॲप ॲक्ट फॉर गोवा यांनी सेसिल रॉड्रिग्ज यांच्या रोस्तो गोवा या मोहिमेसोबत संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे. 

गोव्याचा पूर्ण विकास हे या ॲपची निर्मिती करण्यामागचे मुख्य कारण आहे. तसेच तुमच्या आसपास असणारी ऐतिहासिक स्थळे, पाणथळे आणि महत्वाच्या वास्तूंच्या बाबतीत एखादी चुकीची घटना घडत असेल, तर त्याची नोंदसुद्धा तुमची या ॲपवर पिन करून करू शकता. या ॲपला व्हर्चुअल मॅप जोडण्यात आला असून यामुळे समस्यांची दिशा दर्शविण्याचे कामही आपोआप होते. 

ॲक्ट ऑफ गोवाचे संस्थापक जिल फर्ग्युसन म्हणाले, नागरिकांच्या आसपास असणाऱ्या समस्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी हे ॲप अतिशय महत्वाचे आहे. यामुळे हे ॲप वापरणाऱ्या इतरांना तर त्याचा फायदा होईलच पण यासोबतच या समस्यांचे निराकरण करण्यासाठीसुद्धा मदत होईल. रोस्तो गोवासारख्या संस्था आणि आमच्यासोबत काम करणारे इतर समूह या समस्यांवर मार्ग काढू शकतात. त्यामुळे लोकांनी या ॲपचा वापर त्यांच्या नजीकच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी म्हणजेच अप्रत्यक्षरित्या समाजसेवा करण्यासाठी करावा. 

गोव्यातील नाईन स्टॅक या टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने  पिनइटची निर्मिती केली आहे. राज्यातील लोकांसह पंचायती, नगरपालिका, महानगरपालिका आणि इतर व्यवस्थापनाशी निगडित असणाऱ्यांनी जर हे  पिनइट डाउनलोड केले तर त्यांचे कामही चांगले होईल. ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअरवरती पिनइट ऍक्ट फॉर गोवा असे सर्च करा. पिनइटचा वापर ५०० पेक्षा अधिक लोक करत असून लोकांचे  ॲपबाबतचे मत चांगले आहे.

संबंधित बातम्या