Goa: आमदारांच्या आपात्रताप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी माझ्यासमोर नको, कारण...

Goa: आमदारांच्या आपात्रताप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी माझ्यासमोर नको, कारण...
Court.jpg

पणजी: काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या दहा आमदारांच्या आपात्रतेप्रकरणीचा अर्ज सभापती राजेश पाटणेकर यांनी फेटाळला होता, त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आव्हान दिले होते. ही याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणीस आली असता न्यायमूर्ती महेश सोनक यांनी ‘माझ्यासमोर नको’ असे याचिकादाराच्या वकिलांना सांगितले. त्यामुळे ही सुनावणी आता वेगळ्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर येणार आहे. (Justice Mahesh Sonak said, "I do not want a hearing on the disqualification petition of the MLAs.")

याचिकादारातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत असून त्यांनी या याचिकेवर प्राधान्यक्रमाने सुनावणी घेण्यात यावी. पुढील वर्षी मार्च 2022 मध्ये विधानसभेची पाच वर्षांची मुदत संपत आहे. त्यामुळे ही सुनावणी घेऊन त्यावर निवाडा द्यावा अशी विनंती त्यांनी केली. मात्र न्यायमूर्ती महेश सोनक यांनी या याचिकेतील एका प्रतिवादाची बाजू वकील असताना मांडली होती त्यामुळे ही याचिका मी सुनावणीस घेऊ शकत नाही असे त्यांना सांगितले. 

काँग्रेसच्‍या पंधरा आमदारांपैकी दहा आमदारांनी वेगळा गट स्थापन करून भाजपात प्रवेश केला होता त्याला काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर या 10 आमदारांचे पक्षांतर हे घटनेचे उल्लंघन तसेच बेकायदेशीर 

याचिकेवरील सुनावणी माझ्यासमोर नको
असल्याचे सांगून त्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती. मात्र, सभापतींनी बराच कालावधी घेतल्यानंतर या आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला होता. या निवाड्याला त्यांनी उच्च न्यायालयात सभापतींच्या निवाड्याच्या विरोधात याचिका गेल्या आठवड्यात सादर केली होती. 

राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता
काँग्रेसच्या 10 आमदारांना अपात्र करण्याची याचिका गिरीश चोडणकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्यामुळे फुटीर आमदारांच्या अपात्रताप्रकरणी पुन्हा एकदा नव्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. जोपर्यंत हे प्रकरण खंडपीठासमोर आहे तोपर्यंत या आमदारांवर टांगती तलवार राहणार आहे. काँग्रेसच्या 10 आमदारांपूर्वी मगो पक्षाच्या तीनपैकी दोघा आमदारांनी भाजपात प्रवेश करून मंत्रिपद पटकावले होते, तर काँग्रेसच्या पंधरा आमदारांपैकी दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता.

महत्त्वाचे म्हणजे विरोधी पक्षनेते असलेले बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला होता. त्यापैकी तिघांना मंत्रिपद मिळाले आहे. आता उच्च न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुढील वर्षी मार्च - एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उच्च न्यायालय सभापतींचा निवाडा फेटाळून या फुटीर आमदारांना अपात्र करते की त्यांना अभय देते, हे येणाऱ्या काळात समजणार 
आहे. 

मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांची एकेकाळी मांडली होती बाजू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अपात्रता याचिका सादर केली आहे त्यामध्ये माजी 10 काँग्रेस आमदारांना प्रतिवादी केले आहे. त्यापैकी विद्यमान जलसंपदा मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज याचाही समावेश आहे.

2004 साली रॉड्रिग्ज यांच्याविरुद्धच्या अपात्रता प्रकरणी सभापतींनी त्यांचे विधानसभेतील मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. वकील असताना न्यायमूर्ती महेश सोनक यांनी त्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे त्यांनी आज चोडणकर यांची याचिका सुनाणीस घेण्यास असहमती दाखविली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com