थिएटर आर्ट महाविद्यालयाचे कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने स्थलांतर रखडले

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

केंद्रीय अनुदान आयोगाने (युजीसी) जर विद्यापीठांना कॉलेज सुरू करण्यास सूचना केली आणि गोवा विद्यापीठाने महाविआलये सुरू करण्याचे ठरविले, तर आम्हालाही ते महाविद्यालय सुरू करावे लागेल, थोडी कामे बाकी आहेत ती पूर्ण करता येतील. - गोविद गावडे, कला व संस्कृतीमंत्री

पणजी: कला अकादमीच्या थिएटर आर्ट महाविद्यालयाच्या स्थलांतराला दिवसेंदिवस विलंब लागत चालला आहे. कागदोपत्री खातेनिहाय पाठपुरावा न झाल्याने त्यास वेळ लागत असल्याची माहिती पुढे आली आहे. कला अकादमीच्या थिएटर आर्टचे प्राचार्य म्हणून प्रा. रामराव वाघ यांना पदोन्नती दिली. 

त्यानंतर या महाविद्यालयाने टाळेबंदीमुळे अकादमीतूनच वेबिनारद्वारे इच्छुकांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मोफत प्रशिक्षण दिले, परंतु त्या दरम्यान या महाविद्यालयाचे स्थलांतर कला व संस्कृती खात्याने पाटो येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जुन्या इमारतीत नेण्यास परवानगी दिली. 

त्यास परवानगी मिळाली, परंतु इमारतीत स्थलांतर करण्यापूर्वी तिची काही प्रमाणात डागडुजी करावी लागणार आहे. वर्गांची व कार्यालयाची निर्मिती करणे गरजेचे आहे. 

वास्तविक हे महाविद्यालय व्यवस्थापनाला त्या इमारतीत जुलैमध्येच स्थलांतर करावयाचे होते. परंतु एकामागोमाग एक अडचणी येत राहिल्या.

सध्या महाविद्यालय व्यवस्थानात तांत्रिक क्षेत्रात काम करणारा कर्मचारी नसल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य झाले नाही. त्यामुळे स्थलांतराला  विलंब होत राहिला आहे. 

दोन वर्षांसाठी ही इमारत थिएटर आर्ट महाविद्यालयाकडे असणार आहे. याविषयी प्राचार्य प्रा. रामराव वाघ म्हणाले, की कोरोनामुळे पुरसा कामगारवर्ग नाही. तांत्रिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी रजेवर आहे. 
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सरकारी पातळीवर कागदपत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी अडचणी येत आहेत. याविषयी एक - दोन दिवसांत कला व संस्कृती मंत्र्यांकडे बैठक घेऊन त्याविषयी चर्चा करणार आहोत.

साबांखाच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचा होता विचार
साबांखाच्या या कार्यालयाचे स्थलांतर जुंता हाऊस या इमारतीत करण्यात आल्यानंतर त्या इमारतीचे अमृत योजनेखाली नूतनीकरण करण्यात येणार होते. हे काम इमेजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड कंपनी करणार होती. परंतु हे काम मागे पडले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या