चोडण पंचायतीच्या सरपंचपदी कमलाकांत वाडयेकर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

सत्ताधारी गटातील अलिखित करारानुसार मागील महिन्यात शांबा कळंगुटकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्‍त झाले होते.

डिचोली: मये मतदारसंघातील चोडण-माडेल पंचायतीच्या सरपंचपदाची माळ अखेर अपेक्षेप्रमाणे कमलाकांत वाडयेकर यांच्या गळ्यात पडली आहे. रिक्‍त सरपंचपदासाठी शुक्रवारी (ता. २८) घेण्यात आलेल्या निवडणुकीत वाडयेकर यांची बिनविरोध निवड झाली.

सत्ताधारी गटातील अलिखित करारानुसार मागील महिन्यात शांबा कळंगुटकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्‍त झाले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी पंचायत कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीस मावळते सरपंच शांबा कळंगुटकर यांच्यासह उपसरपंच कल्पना धुरी, दिक्षा कुंडईकर, बबिता कळंगुटकर, पंढरी वेर्णेकर, प्रसाद चोडणकर, लॉरेन्स कुलासो आणि कमलाकांत वाडयेकर हे आठ पंचसदस्य उपस्थित होते. तर रामा कुबल अनुपस्थित होते.

सरपंचपदासाठी कमलाकांत वाडयेकर यांनी सादर केलेल्या अर्जावर सुचक आणि अनुमोदक म्हणून अनुक्रमे शांबा कळंगुटकर आणि पंढरी वेर्णेकर यांनी सही केली. निरीक्षक म्हणून तिसवाडी गट विकास कार्यालयाच्या अधिकारी स्नेहा जीते तर निर्वाचन अधिकारी म्हणून संदेश नाईक उपस्थित होते. निर्वाचन अधिकाऱ्यांनी कमलाकांत वाडयेकर यांचा अर्जं ग्राह्य धरून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी पंचायत सचिव रंजना सावळ यांनी सहकार्य केले. सरपंचपदी निवड झाल्यानंतर कमलाकांत वाडयेकर यांनी समर्थक पंचसदस्यांसह आमदार प्रवीण झांट्ये यांची भेट घेतली. आमदार झांट्ये यांनी नवनिर्वाचित सरपंच वाडयेकर यांचे अभिनंदन करुन विकासकामांसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सहकारी पंचसदस्यांना विश्वासात घेऊन पंचायतीच्या विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच कमलाकांत वाडयेकर यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार प्रवीण झांट्ये यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच श्री. वाडयेकर आणि समर्थक पंचांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित सरपंच श्री. वाडयेकर यांचे अभिनंदन केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या