काम्र द मुनसिपल ते पेडणे नगरपालिका

प्रकाश तळवणेकर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

पोर्तुगीज काळात पेडणे तालुक्यातील  सगळ्या गावांची पेडणे ही ‘काम्र द मुनसिपल’ या नावाने नगरपालिका अस्तित्वात होती. या  ‘काम्र मुनसिपल’च्या प्रमुख अधिकारपदी तालुक्याचे मामलेदार कामकाज हाताळायचे.

पेडणे:  पोर्तुगीज काळात पेडणे तालुक्यातील  सगळ्या गावांची पेडणे ही ‘काम्र द मुनसिपल’ या नावाने नगरपालिका अस्तित्वात होती. या  ‘काम्र मुनसिपल’च्या प्रमुख अधिकारपदी तालुक्याचे मामलेदार कामकाज हाताळायचे. तर ‘हॉगाळ’ म्हणजे नगरसेवकांची नेमणूक ही सरकारतर्फे केली जात होती. बैठकीला पोर्तुगीज भाषेत ‘सेसाव’ म्हणत. या ‘हॉगाळ’ना (नगरसेवकांना)  एक एक दांडा दिला होता. हा दांडा म्हणजे प्रतिष्ठेचे साधन. बैठकीला येताना प्रत्येक “हॉगाळ’’ हा  दांडा घेऊन यायचा.  बैठकीचे अध्यक्षस्थान  मामलेदार राहात होते.

गोवामुक्तीनंतर १९६३  मध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी दहा प्रभागातून निवडणुका झाल्या. नगराध्यक्षपदी विष्णू गणेश देशप्रभू, उपनगराध्यक्षपदी शांताराम ऊर्फ आपा पेडणेकर यांची निवड झाली. गोविंद कशालकर, बाबाजी शेटकर,  श्रीधर कोटकर, भालचंद्र किनळेकर, श्रीमती चंपुबाई भास्कर महात्मे, अन्थोनी मास्कारेन्हा व लक्ष्मण सावळ देसाई हे पेडणे नगरपालिकेचे पहिले नगरसेवक तर श्रीमती सत्यभामा राजाराम पेडणेकर ह्या स्वीकृत नगरसेविका. 

इजिदोर एका वर्षाच्या कालावधीत श्रीधर कोटकर व भालचंद्र किनळेकर यांचे निधन झाले. त्यांच्या प्रभागातून अनुक्रमे परशुराम कोटकर व गणपत किनळेकर हे निवडून आले. पेडणे नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत निवडून आलेला गट हा काँग्रेस पक्षाचा होता. लक्ष्मण सावळ देसाई हे कम्युनिस्ट पक्षाचे तर गणपत किनळेकर व परशुराम कोटकर हे म. गो. पक्षाचे नगरसेवक. या पहिल्या पालिका मंडळातील परशुराम कोटकर व गणपत किनळेकर हे दोन नगरसेवक वगळता अन्य आज हयात नाहीत.

१९७९ मध्ये या पहिल्या नगरपालिका मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी पेडणे पालिका बरखास्त करून येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आणली. पंचायत निवडणुकीनंतर नारायण मयेकर एक वर्षभर सरपंच तर परशुराम कोटकर यांनी चार वर्ष सरपंच पद भूषविले. 

त्यानंतर एक वर्षभर श्री. कोटकर यांनी प्रशासक म्हणून पद भूषविले. पालिकेचे पंचायतीत रूपांतर करताना पालिकेचा मालपे, वळपे, नयबाग, अनाळे व तुयेचा काही भाग जवळच्या पंचायतीत टाकला.  त्यानंतर १९८९ मध्ये काँग्रेस सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी जितेंद्र देशप्रभू यांची नगराध्यक्षपदी, उपनगराध्यक्षपदी विष्णू देसाई व स्वीकृत नगरसेविका म्हणून श्रीमती रोशन श्रीकृष्ण चोडणकर यांची नियुक्ती करून पेडणे नगरपालिका पुनर्जीवित केली. त्यानंतर १२ ऑक्टोबर १९८९ या दिवशी पेडणे नगरपालिकेची निवडणूक झाली. त्यात परशुराम कोटकर यांच्या नेतृत्वाखाली म.गो. पुरस्कृत गट ७ जागा जागा मिळवून सत्तेवर आले. काँग्रेस पुरस्कृत गटाचे विष्णू देसाई, प्रदीप देशप्रभू व मोहन पेडणेकर हे तिघेजण निवडून आले. तर नियुक्त नगराध्यक्ष जितेंद्र देशप्रभू यांना डॉ. वासुदेव देशप्रभू यांच्या कडून पराभव स्वीकारावा लागला. 

म.गो. पक्षाच्या राजवटीत तत्कालीन मुख्यमंत्री  शशिकला काकोडकर यांनी नगरपालिका बरखास्त करताना पालिका क्षेत्रातील काही भाग जवळच्या ग्रामपंचायत क्षेत्रात टाकला. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या राजवटीत तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी पालिका पुनर्जीवित करताना पालिका अस्तित्वात असताना असलेला पूर्वीचा भाग समाविष्ट करून नंतर पालिका पुनर्जीवित करण्याची जी काळजी घेणे आवश्यक होते. तसे केले नाही. यामुळे या पालिकेचे क्षेत्रफळ हे मर्यादित झाले बाजारातील सोपा कर, इमारतींचे भाडे, पालिकेच्या दुकान गळ्यांचा कर, घरपट्टी, बांधकाम परवान्यावरील फी, व्यापारावर फी हीच पालिकेची उत्पन्नांची साधने आहेत. पालिका क्षेत्रात कारखाना किंवा मोठा कर वगैरे मिळेल, असे कुठलेही साधन नाही.

पालिका क्षेत्रात तीन प्राथमिक सरकारी शाळा, तीन खाजगी प्राथमिक शाळा, तीन हायस्कूल व एक सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय व एक  औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे.  

पाणी पुरवठ्यासंबंधी विशेष समस्या नसल्या तरी अधून मधून नळाला पाणी न येणे वगैरे कारणामुळे लोकांना, व्यावसायिकांना त्रास सहन करावे लागतात.

अनेक ठिकाणी विहिरी आहेत व घरोघरी मोफत नळजोडणी योजना पोचलेली आहे.  न्यूवाडा येथे योग्य प्रकारे गटार नसल्यामुळे सांडपाणी तुंबून राहते व काही वेळा मुख्य रस्त्यावर पण येते.  मासळी मार्केट मधील मटण,  मासळी आदींचे सांडपाणी ठरावीक अंतरावर जाऊन तुंबते व सगळीकडे दुर्गंधी पसरते. याच परिसरात श्री. रवळनाथ मंदिर आहे. येथे मासळी मार्केट असले तरी बाजारासाठी स्वतंत्र जागा नाही. यामुळे गुरुवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार मुख्य रस्त्यावरच भरविला जातो.

एरवीही बहुतांश विक्रेते रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपला माल विक्री करायला बसतात.  यामुळे पेडणे ते पार्से – चोपडा- मान्द्रे- मोरजीला जाणारी वाहने दुसऱ्या मार्गाने वळवावी लागतात. यामुळे बस , ट्रक अशा अवजड वाहनांची बरीच कुचंबणा होते. सध्या आठवड्याचा बाजाराचा व्याप बराच वाढलेला आहे. 

पेडणे उद्यानाच्या जागेपासून पेडणे न्यायालयाच्या इमारती पर्यंत दूरवर रस्त्याच्या दुतर्फा व रस्त्याच्या मधोमध बाजारासाठी आपला माल विक्रेते थाटतात. त्यातच बाजारातील गिऱ्हाईकांच्या गर्दीमुळे बाजारात सहजपणे फिरता येत नाही.

आतापर्यंतचे नगराध्यक्ष 
1) विष्णू गणेश देशप्रभू, 2) जितेंद्र देशप्रभू  (नियुक्त), 3) परशुराम कोटकर, 4) वासुदेव देशप्रभू, 5) विष्णू देसाई, 6) उज्वला तिरोडकर, 7) प्रिती बोंद्रे, 8) विशाखा गडेकर, 9) इजिदोर फर्नांडिस, 10) सुधीर देशप्रभू, 11) रेषा माशेलकर, 12) नूतन आरोसकर, 13) निलेश पेडणेकर, 14) वासुदेव देशप्रभू, 15) स्मिता कुडतरकर, 16)उषा नागवेकर, 17) श्रध्दा माशेलकर, 18) सुविधा तेली, 19) श्वेता कांबळी (विद्यमान नगराध्यक्ष). आता पर्यंत एकूण एकोणीस नगराध्यक्ष झाले, त्यात दहा महिला नगराध्यक्ष झाल्या.

संबंधित बातम्या