कपिल झवेरीचे भाजप नेत्यांचेही संबंध लागेबांधे

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

आमदार खंवटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांसमवेत संशयित कपिल झवेरी याचे जे छायाचित्र आहे ते एका वर्षापूर्वीचे असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र हे छायाचित्र झवेरी हे मुख्यमंत्र्यांना २४ एप्रिल २०२० रोजी वाढदिनी शुभेच्छा देतानाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना लोकांची दिशाभूल केली आहे.

पणजी: हणजूण रेव्ह पार्टी प्रकरणाचा अंडरवर्ल्ड व हवाला याच्याशी संबंध आहे. या प्रकरणातील संशयित कपिल झवेरी व सहयोगी अनेक अवैध व्यवहाराशी जोडलेले असून त्यामध्ये भाजप नेत्यांचेही लागेबांधे आहेत, असा आरोप आमदार रोहन खंवटे यांनी करून या व्यवहारातून ‘मनी लाँडरिंग’चे सिंडिकेट होत असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे आहेत व ते मी केंद्रीय यंत्रणेसमोर सिद्ध करीन, असा दावा केला आहे.  

आमदार खंवटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांसमवेत संशयित कपिल झवेरी याचे जे छायाचित्र आहे ते एका वर्षापूर्वीचे असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र हे छायाचित्र झवेरी हे मुख्यमंत्र्यांना २४ एप्रिल २०२० रोजी वाढदिनी शुभेच्छा देतानाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना लोकांची दिशाभूल केली आहे. रेव्ह पार्टीच्या ठिकाणी स्वातंत्र्यदिनादिवशी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. मात्र, गुन्हा नोंद करण्यासाठी दुसऱ्या दिवशी बारा वाजले. त्यामुळे हा गुन्हा नोंद करण्यास दबाव येऊनही पोलिस अधिकारी त्याला दबले नाहीत. या प्रकरणात २३ जणांना अटक करण्यात आली तर फक्त चार जणांविरुद्धच ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र इतर १९ जणांना या गुन्ह्यातून वगळताना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली. ते पार्टीत सामील झाल्याने ते सुद्धा या गुन्ह्यास पात्र होते. या पार्ट्या मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाहीत, असे खंवटे म्हणाले. 

रेव्ह पार्टीप्रकरणी अटक केलेला कपिल झवेरी हा अनेक कंपनीचा संचालक आहे. त्यात तिरुमल तिरुपती बहुराज्य सहकारी पतसंस्थेचा समावेश आहे. या संस्थेचे अध्यक्ष गुरमित सिंग भांब्राह हे आहेत. सिंग हे कॅनडा येथील ग्लोबल टी - २० लिग सामने आयोजित करतात. झवेरी याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, आमदार दयानंद सोपटे यांच्यासमवेत जी छायाचित्रे आहेत त्यामध्ये गुरमित सिंग तसेच चंद्रकांत आप्पासाहेब भोजे पाटील आहेत. कॅनडामध्ये सहभागी झालेल्या एका कंपनीच्या संघाचे ते संचालक आहेत. या कंपनीमध्ये विलास देसाई व विनय तेंडुलकर यांनी विनिल तेंडुलकर यांच्या नावाने गुंतवणूक केलेली आहे. कंपन्यांमध्ये तसेच पतसंस्थेमध्ये गुंतवलेल्या पैशांची उलाढाल सट्टेबाजी तसेच काळा पैसा अधिकृत करण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप करून खंवटे यांनी केला. ज्या कंपनीमध्ये पाटील, बामरा व झवेरी हे संचालक आहेत त्या कंपन्यांचा पत्ता फोंडा येथील आहे. यावरून या व्यवहारातून ‘मनी लाँडरिंग’ केली जात आहे. या संदर्भात पुरावे जमा केले आहेत व पैशांचा व्यवहार मनी लाँडरिंग, सट्टेबाजी, ड्रग्ज, बॉलिवूड व वेश्‍या प्रकरणात केला जातो याची सविस्तर माहिती दिल्ली तेथे जाऊन जमा करणार आहे. त्यामुळे हे फक्त ‘ट्रेलर’ असून ‘पिक्चर’ अजून बाकी आहे. ‘झवेरी कांड व कनेक्शन’ उघड केल्यावर भाजपच्या अनेक नेत्यांचा पर्दाफाश होणार असल्याचे खंवटे म्हणाले. 

आमदार खंवटेंचे आरोप निराधार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कपिल झवेरी याने मुख्यमंत्र्यांची भेट २४ एप्रिल रोजी घेतल्याचा आमदार रोहन खंवटे यांनी केलेला आरोप विनाआधार आहे. ही भेट २४ एप्रिल रोजी घेण्यात आलेली नाही. कारण झवेरी यानेच फेसबुकवर तेच छायाचित्र २ जानेवारी रोजी पोस्ट केलेले आहे. याचा अर्थ एकच छायाचित्र अनेक तारखांना वापरण्यात आले आहे. आमदारांनी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी खातरजमा करावी.

खंवटे यांनी माफी मागावी: खासदार तेंडुलकर
बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी विनाअट माफी मागावी, अशी मागणी खासदार विनय तेंडुलकर यांनी केली आहे. ते म्हणाले, मंत्रिपद गेल्यापासून खंवटे वैफल्यग्रस्त बनले असून ते अशी बडबड करत असतात. त्यांनी मी कोणती स्पर्धा आयोजित केली त्याची कागदपत्रे सादर करावी. एक जरी कागद त्यासंदर्भात दर्शवला तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देईन. अन्यथा खंवटे यांनी राजीनामा द्यावा. मी आता दिल्लीला जात आहे. दिल्लीहून परतल्यावर खंवटे यांना कायदेशीर नोटीस बजावली जाईल. त्यांनी विनाअट माफी मागीतलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीनाचा दावा दाखल करणार आहे. बहुजन समाजाची पिळवणूक करून गब्बर झालेल्या या नेत्यांचे ताळतंत्र सुटले आहे त्यांना त्यांची जागा आता दाखवावीच लागेल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या