सामाजिक अंतर राखा, अन्यथा किनाऱ्यावरील मासे विक्री बंद

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

जिल्हाधिकाऱ्यांचा करंजाळे येथील मच्छिमारांना इशारा

पणजी: सामाजिक अंतर पाळा नाहीतर किनाऱ्यावर मासळी विक्री करू देणार नाही, असे करंजाळे येथील किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या रापणकारांना तथा मच्छीमारांना आज जिल्हाधिकारी आर. मणेका यांनी खडेबोल सुनावले. सामाजिक अंतर राखले जात नसल्याने आज उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी रापणकारांची आणि इतर विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस मच्छीमार खात्याचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी, आयुक्त संजित रॉड्रिग्स, महापौर उदय मडकईकर, आरोग्य खात्याचे अधिकारी, पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी, त्या प्रभागाचे नगरसेवक आणि मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

करंजाळे किनाऱ्यावर पारंपरिक रापणकार  मासेमारी करतात. किनाऱ्यावर समुद्रात काही अंतरावर जाळे टाकून नंतर ते बाहेर ओढले जाते. ही ताजी मासळी खरेदीसाठी पणजी, सांताक्रूझ, बांबोळी येथून लोक येतात. त्यावेळी सामाजिक अंतर अजिबात पाळले जात नसल्याची छायाचित्रे तथा व्हिडिओ प्रसार माध्यमांतून आणि समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत. त्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

कोरोनाचा समूह संसर्ग वाढत आहे. त्याशिवाय पणजी महापालिका कार्यक्षेत्रात दोनशेच्यावर रुग्ण अॅक्टिव्ह आहेत . त्याशिवाय दररोज २० च्यावर रुग्ण सापडत आहेत. किनाऱ्यावर मासे खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. या गर्दीवर मच्छीमार खात्याने लक्ष ठेवावे. जर सामाजिक अंतर पाळले गेले नाही तर किनाऱ्यावर मासळी विक्री करू दिली जाणार नाही, असे मेनका यांनी स्पष्टपणे मच्छिमारांना सूचित केले.  करंजाळे परिसरात शंभर ते दीडशे मच्छिमार असून ते रापणीने मासेमारी करतात.

संबंधित बातम्या