ISL: ईस्ट बंगालसमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

 ईस्ट बंगाल संघ सलग पाच सामन्यात अपराजित आहे, तर केरळा ब्लास्टर्सनेही मागील लढतीत विजयाची चव चाखली, आता या दोन्ही संघांची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत घोडदौड राखण्याचे लक्ष्य राहील.

पणजी: ईस्ट बंगाल संघ सलग पाच सामन्यात अपराजित आहे, तर केरळा ब्लास्टर्सनेही मागील लढतीत विजयाची चव चाखली, आता या दोन्ही संघांची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत घोडदौड राखण्याचे लक्ष्य राहील. सामना वास्को येथील टिळक मैदानावर शुक्रवारी (ता. 15) खेळला जाईल.

रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालची कामगिरी खराब सुरवातीनंतर जास्त उल्लेखनीय आहे. मागील लढतीत त्यांनी मातब्बर बंगळूरलाही त्यांनी एका गोलने हरविले. जॅक मघोमा, ब्राईट एनोबाखारे, मॅटी स्टेनमन यांच्या धारदार खेळामुळे ईस्ट बंगालचे आक्रमण जास्त भेदक ठरत आहे.

केरळा ब्लास्टर्ससमोर या त्रिकुटाचा जास्त धोका असेल. मागील पाच लढतीत दोन विजय व तीन बरोबरी नोंदविलेल्या कोलकात्याच्या संघाने आणखी एक विजय नोंदविल्यास त्यांची गुणतक्त्यातील कामगिरी कमालीची सुधारेल. सध्या 10 लढतीतून दोन विजय, चार बरोबरी व चार पराभव या कामगिरीसह त्यांचे 10 गुण आहेत.

केरळा ब्लास्टर्सच्या खाती नऊ गुण आहेत. अगोदरच्या जमशेदपूरविरुद्ध विजय मिळविताना केलेला खेळ कायम राखण्यावर त्यांचा भर असेल. एक खेळाडू कमी होऊनही त्यांनी झुंजार विजय प्राप्त केला होता. त्यांचा जॉर्डन मरे सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. जमशेदपूरविरुद्ध त्याने दोन गोल केले होते.

किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 10 लढतीत दोन विजय, तीन बरोबरी, पाच पराभव अशी कामगिरी केलेली आहे. जमशेदपूरविरुद्ध रेड कार्ड मिळालेला केरळा ब्लास्टर्सचा बचावपटू लालरुआथारा शुक्रवारच्या लढतीत निलंबित असेल. केरळा ब्लास्टर्सने स्पर्धेत 19 गोल स्वीकारले आहेत, कमजोर बचावाची डोकेदुखी या संघाला सतावत आहे.

 

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 1-1 गोलबरोबरी

- ईस्ट बंगालचे 10, तर केरळा ब्लास्टर्सचे 13 गोल

- केरळा ब्लास्टर्सच्या जॉर्डन मरे याचे 5 गोल

- ईस्ट बंगालच्या जॅक मघोमा आणि मॅटी स्टेनमन यांचे प्रत्येकी 3 गोल

- केरळा ब्लास्टर्स व ईस्ट बंगालच्या स्पर्धेत प्रत्येकी 2 क्लीन शीट्स

 

................

संबंधित बातम्या