पिळगावात खारफुटीच्या झाडांची सुरू आहे कत्तल

तुकाराम सावंत
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

पिळगाव पंचायत क्षेत्रातील मुर्डीवाडा-तारवाडा परिसरात मांडवी नदीकाठी मोठ्या प्रमाणात मॅनग्रोव्ह (खारफुटी) झाडांची कत्तल करण्यात आली असून, नदीकाठची खारपुटीची झाडांची जंगले बोडकी झाली आहेत.

ंडिचोली
पिळगाव पंचायत क्षेत्रातील मुर्डीवाडा-तारवाडा परिसरात मांडवी नदीकाठी मोठ्या प्रमाणात मॅनग्रोव्ह (खारफुटी) झाडांची कत्तल करण्यात आली असून, नदीकाठची खारपुटीची झाडांची जंगले बोडकी झाली आहेत. या प्रकारामुळे स्थानिकामध्ये खळबळ माजली असून, या प्रकाराकडे सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची त्यांची तक्रार आहे. 
नैसर्गिक संपत्ती असलेल्या आणि नदीकाठाची धूप रोखण्यास मदत करणाऱ्या खारफुटीच्या झाडांवर घालण्यात येणारा हा घाला वेळीच थांबवावा. तसेच या कृत्यात गुंतलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तर खारफुटी झाडांच्या बेकायदा कत्तलीमुळे भविष्यात गावावर मोठे संकट कोसळणार असल्याची भीती स्थानिक पंच अनिल नाईक यांनी व्यक्‍त केली आहे. 
दरम्यान, रविवारी (ता. २) मुर्डीवाडा येथे बेकायदेशीरपणे खारफुटीच्या झाडांची कत्तल सुरू होती. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक त्या ठिकाणी जमले. त्यांनी आवाज केल्यानंतर खारफुटीच्या झाडांची कत्तल करणाऱ्यांनी तेथून पलायन केले, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. 
मुर्डीवाडा-पिळगाव येथील एका औद्योगिक आस्थापनाजवळ मांडवी नदीकाठी सर्व्हे क्र. २१८ या जागेतील खारफुटीची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास दीड हजारच्या आसपास खारफुटीची झाडे तोडण्यात आली आहेत. मागील वर्षी ऑक्‍टोबर महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. या प्रकरणी मागील वर्षी १९ ऑक्‍टोबर रोजी स्थानिक पंचायतीकडे आपण लेखी तक्रार केल्यानंतर पंचायतीने लागलीच २१ ऑक्‍टोबर रोजी क्षेत्रीय वन अधिकारी कार्यालयाकडे ही तक्रार पुढे केली होती. मात्र, त्यानंतर कोणतीच कारवाई झाली नाही, असा दावा स्थानिक दत्ताराम साळगावकर यांनी केला आहे. तर खारफुटी झाडांच्या कत्तलीमुळे नदीकाठाची धूप होवून पावसाळ्यात नदीचे पाणी तारवाडा परिसरात घुसण्याची शक्‍यता आहे, अशी भीती स्थानिक नागरिक सुरेश चोडणकर यांनी व्यक्‍त केली आहे. स्थानिक पंचायत तसेच संबंधित सरकारी यंत्रणांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. अशी मागणीही त्यांनी केली. 

प्रकल्पासाठी कत्तल..! 
जोरदार पाऊस पडला की, भरतीच्यावेळी नदीचे पाणी तारवाडा येथील लोकवस्तीत घुसते. त्यात आता खारफुटीची जंगल बोडकी झाल्यास नदीकाठाची धूप होवून नदीचे पाणी तारवाडा येथील घरांनी घुसून हा वाडा पाण्याखाली येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशी भीती स्थानिक पंचसदस्य अनिल नाईक यांनी व्यक्‍त केली. ज्या ठिकाणी मॅनग्रोव्हची (खारफुटी) झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्या ठिकाणी दिल्लीस्थीत एका व्यक्‍तीकडून प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती अनिल नाईक यांनी देऊन, हा प्रकल्प झाल्यास भविष्यात संपूर्ण पिळगाव गावाला त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत, अशीही भीती त्यांनी व्यक्‍त केली.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या