स्वप्नील वाळके खून प्रकरण: क्राईम ब्रँचचे पथक पिस्तूल चौकशीसाठी बिहारला जाणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

स्वप्नील वाळके यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल बिहार येथून खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे क्राईम ब्रँचचे पथक चौकशीसाठी येत्या काही दिवसांत जाणार आहेत.

पणजी: मडगाव येथील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणातील संशयित मुस्तफा शेख, एव्हेंडर रॉड्रिग्ज व ओमकार पाटील या तिघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आणखी चार दिवसांनी वाढ केली. या खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल बिहार येथून खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे क्राईम ब्रँचचे पथक चौकशीसाठी येत्या काही दिवसांत जाणार आहेत. 

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीवेळी मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व त्यानंतर सोडून दिलेल्या एडिसन गोन्साल्वीस याच्या अटपूर्व जामिनावरील सुनावणी त्याच्या वकिलांनी वेळ मागितली त्यामुळे ही सुनावणी आता येत्या बुधवारी (१६ सप्टेंबरला) ठेवली आहे. तिघा संशयितांची दहा दिवसांची कोठडी काल संपल्याने क्राईम ब्रँचने त्यांना आज न्यायालयात उभे केले होते. या प्रकरणाचा तपास अजून पूर्ण झालेला नाही तसेच नोंद करण्यात आलेल्या जबान्यांची पडताळणी करण्यासाठी संशयितांच्या कोठडीची आवश्‍यकता आहे अशी बाजू सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडली. 

संशयित मुस्तफा शेख याने स्वप्नील वाळके याचा पिस्तूलने गोळी झाडून खून केला. हे पिस्तूल संशयित एव्‍हेंडर रॉड्रिग्ज याने बिहार येथून विकत घेतले होते. त्याने चौकशीत पोलिसांना दिलेल्या जबानीत हे पिस्तूल बिहारमधील एका रेल्वे स्थानकावर एका तरुणाकडून खरेदी केले होते. त्या तरुणाचा मोबाईल क्रमांकही पोलिसांना एव्हेंडरच्या मोबाईलमधून शोधून काढला आहे. मयत स्वप्नील तसेच संशयितांमध्ये संवाद झाला होता का याची माहिती त्यांच्या मोबाईलमधील क्रमांकामधून शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत असून सध्या तरी अजून तसा पुरावा सापडलेली नाही, अशी माहिती पोलिस सूत्राने दिली. 

संशयित एव्हेंडर रॉड्रिग्ज याने जबरी चोरी करताना धाक दाखविण्यासाठी पिस्तूल बिहार येथून विकत घेतले होते. त्याच्या चौकशीसाठी पोलिस पथक जाण्यासाठी तयारी करत आहे. मात्र, सध्या रेल्वे सेवा नसल्याने तेथपर्यंत पोहचण्यासाठी अडथळा झाला आहे. चौकशी करण्यासाठी जाताना सोबत संशयिताला नेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या