किरण कांदोळकर चांगले राजकारणी

Narendr Tari
शुक्रवार, 31 जुलै 2020

राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यायला हवे. लोकांच्या समस्यांची जाणीव असलेले आणि या समस्यांचा पाठपुरावा करणारे राजकारणी जर निवडून आले, तर जनतेच्या हितालाच प्रथम प्राधान्य मिळते. थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर हे एक चांगले राजकारणी आहेत. समस्यांशी भिडण्याची त्यांची तयारी आणि राजकारण्यांच्यादृष्टीने अजून सळसळते रक्त असल्याने एक उत्कृष्ट राजकारणी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भविष्यात किरण कांदोळकर यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादही असतील, असे मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

फोंडा
आज भारतीय जनता पक्षात ज्येष्ठ आणि पक्षासाठी तळमळीने कार्य केलेल्यांना वापरा आणि फेका या तत्वावर लाथाडले जात आहे, हे चुकीचे असल्याचे सांगून किरण कांदोळकर यांचाही असाच वापर झाल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले.
किरण कांदोळकर आपल्याला भेटले होते, असे नमूद करून आपल्याशी त्यांची राजकीय स्थिती, नवीन पक्ष स्थापनेची चाचपणी व इतर विषयांवरही चर्चा झाली. आपण चांगल्या राजकारण्यांना नेहमीच सहकार्य केले आहे, पाठिंबा दिला आहे. तसाच तो किरण कांदोळकर यांनाही दिला असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले.
किरण कांदोळकर यांना मगो पक्षात प्रवेश दिला जाईल काय, असे विचारल्यावर पक्षप्रवेश किंवा पुढील निवडणूक व राजकीय वाटचाल यासंबंधी नंतर निर्णय घेतला जाईल, असे सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. एखादा राजकीय पक्ष स्थापन करणे सोपे असते, पण तो टिकवणे आणि लोकाभिमुख करणे हे महत्‌कठीण काम असते, आपण गेली दोन दशके मगोसाठी कशाप्रकारे काम केले आहे ते मलाच ठाऊक आहे, अशा शब्दात ढवळीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मगो पक्षाने गोव्याला लोकाभिमुख प्रशासन दिले, पण नंतरच्या काळात मगो पक्षाचे आमदार काँग्रेसने पळवले आणि आता भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे आणि मगोचे आमदार पळवले. स्वतःला स्वच्छ म्हणवणाऱ्या भाजपने ही पळवापळवी आणि फोडाफोडी आता स्वतःच सुरू केली असून या पक्षासाठी तळमळीने कार्य केलेल्या नेत्यांना लाथाडण्याचा प्रकार होत आहे. काँग्रेसचे दहा आमदार मिळाल्यामुळे भाजपला आपल्या प्रामाणिक नेत्यांचा विसर पडला असल्याचेही सुदिन ढवळीकर म्हणाले.
मगो पक्षाने चांगल्या उमेदवारांना तिकिटे दिली. गेल्या निवडणुकीतही आम्ही असे उमेदवार निवडले, पण भाजपने सत्ता स्थापनेसाठी मगोचे दोन आमदार रातोरात पळवले. येत्या ७ ऑगस्टला न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. खरे काय आणि खोटे काय, हे त्यावेळीच स्पष्ट होईल, असे सांगून मगोची साथ सोडलेल्यांना आणि मगोला फोडणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.

‘डिसेंबरनंतरच ‘मगो’चा निर्णय’
मगो पक्षातर्फे येत्या डिसेंबरनंतरच येत्या निवडणूक तसेच इतर राजकीय परिस्थितीसंबंधी निर्णय घेतला जाईल. चांगल्या उमेदवारांना मगो पक्षाने नेहमीच जनतेसमोर आणले, पण गद्दारी करण्याचा प्रकार मगोच्या तिकिटावर निवडून आलेल्यांनी केला आहे, त्यांना जनता माफ करणार नाही, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या