मनोरुग्ण बहिणीकडून चाकू हल्ला; आईला वाचवताना भाऊ जखमी 

वार्ताहर
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

आईला वाचवताना भाऊ जखमी; मुरगे - साकोर्डा येथील घटना

फोंडा/तांबडीसुर्ला: मुरगे - साकोर्डा येथे मनोरुग्ण बहिणीकडून झालेल्या चाकू हल्ल्यात आईला वाचवताना भाऊ आडवा गेल्याने त्याच्या पोटात चाकू खुपसल्याने तो जबर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून जखमीला उपचारासाठी गोमॅकोत हलविण्यात आले आहे. कुळे पोलिसांनी खुनासाठी वापरलेला चाकू व संशयितत महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सख्ख्या भावाचा खून करण्याचा प्रयत्न केलेली छत्तीस वर्षीय महिला मनोरुग्ण असून गेल्या दहा वर्षांपूर्वी तिचा हडकोण - बाणस्तारी येथे विवाह झाला होता. ही विवाहित महिला मनोरुग्ण असल्याचे कळताच दोन महिन्यानंतर पतीने तिला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून ती आपल्या माहेरी कुटुंबियांसोबत आई विजया गालकर (वय ६०) व अविवाहित भाऊ केशव गालकर (वय ३८) यांच्याकडे राहत होती. या तिघांमध्ये रोज जमिनीचा वाद तसेच लग्नावरून खटके उडत होते. संशयित महिलेला मधुमेह व मानसिक स्थितीचा त्रास जाणवत होता. म्हणून ती झोपेच्या गोळ्या घेत असल्याचे समजते. त्यातच हा खुनी हल्ला झाला असावा असा पोलिसांनी संशय व्यक्त केला.
 
बहिणीने सख्या भावाच्या पोटात धारदार चाकू खुपसल्याने केशव गालकर हा रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. संशयित हर्षा गालकर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिने वापरलेला धारदार चाकूही जप्त केला आहे. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला पिळये - धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर जखमीची स्थिती गंभीर असल्याने त्याला त्वरित पुढील उपचारासाठी गोमॅकोत हलवण्यात आले. मुरगे - साकोर्डा येथे खून झाला त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. पुढील तपास कुळे पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी करीत आहेत.

संबंधित बातम्या