आथाईद ग्रंथालयात ज्ञानसमृद्ध ग्रंथभांडार

sudesh Arlakar
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

बार्देश तालुक्यात अनेक लहानमोठी ग्रंथालये आहे. त्यापैकी काही नवीन तर काही पोर्तुगीज राजवटीपासून आजपर्यंत अस्तित्वात आहे; परंतु, या सर्वांत लोकप्रिय म्हणून म्हापसा शहरात कार्यरत असलेल्या ज्ञानसमृद्ध ग्रंथभांडाराने युक्त अशा ‘आथाईद नगरपालिका ग्रंथालया’कडे आत्मीयतेने पाहिले जाते. वर्ष १८८३ मध्ये सुरू झालेले या ग्रंथालयाने १३६ वर्षांचा टप्पा ओलांडलेला आहे.

म्हापसा

बार्देश तालुक्यात अनेक लहानमोठी ग्रंथालये आहे. त्यापैकी काही नवीन तर काही पोर्तुगीज राजवटीपासून आजपर्यंत अस्तित्वात आहे; परंतु, या सर्वांत लोकप्रिय म्हणून म्हापसा शहरात कार्यरत असलेल्या ज्ञानसमृद्ध ग्रंथभांडाराने युक्त अशा ‘आथाईद नगरपालिका ग्रंथालया’कडे आत्मीयतेने पाहिले जाते. वर्ष १८८३ मध्ये सुरू झालेले या ग्रंथालयाने १३६ वर्षांचा टप्पा ओलांडलेला आहे.
हे गोव्यातील सर्वाधिक जुने पालिका ग्रंथालय तथा वाचनालय आहे. गोव्यात पोर्तुगीज राजवट असताना डॉ. ज्योकीम बी. आझावेदो या व्यक्तीने आज वटवृक्षाच्या रूपात दिसणाऱ्या या ग्रंथालयाची स्थापना १२ नोव्हेंबर १८८३ रोजी केली. समाजाची बौद्धिक गरज लक्षात घेऊन वाचनाचे वेड असेलेल्या डॉ. जुझे यांनी परिसरातील काही मित्रांना संघटित करून त्यांची एक समिती तयार केली. त्या समितीच्या माध्यमातून एक ग्रंथालय सुरू करण्यात आले. म्हापसा शहरातील जुन्या मामलेदार कार्यालयात सुरुवातीला हे ग्रंथालय कार्यरत होते.
सध्या गिरी-बार्देश येथील डोंगर टेकडीवर असलेल्या गोव्यातील प्रख्यात शिक्षणसंस्थेचे संस्थापक ‘फादर फ्रांसिस्को लुईस गोन्झागा दी आथाईद’ यांनी बार्देश तालुक्यातील हजारो युवकांना ज्ञान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते. त्यांच्या कार्याचे कायमस्वरूपी स्मरण व्हावे म्हणून या खासगी ग्रंथालयाचे ‘आथाईद बिबलिओथेका’ म्हणजे ‘आथाईद ग्रंथालय’ असे नामांतर करण्यात आले. हे नामांतर करताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत कोणतेही दुमत नव्हते व त्यामुळे तो निर्णय एकमुखाने झाला.
कालांतराने ९ एप्रिल १८९७ रोजी या ग्रंथालयाचा ताबा ‘काम्र दी बारदेश’ म्हणजेच नगरपालिकडे देण्यात आला. पोर्तुगीज राजवटीच्या काळात संपूर्ण बार्देश तालुक्यासाठी एकच नगरपालिका अस्तित्वात होती. पोर्तुगीज राजवट गोव्यातून गेल्यानंतर १९६८ साली नगरपालिका कायदा गोव्यात अंमलात आणला गेला. त्याद्वारे म्हापसा नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या ग्रंथालयाचा कार्यभार म्हापसा नगरपालिकेकडे आला. परिणामी हे ग्रंथालय खासगी मालमत्ता न राहता सार्वजनिक मालमत्ता बनली.
तत्त्वज्ञान, धार्मिक, समाजशास्त्र, साहित्य, भाषाविज्ञान, व्याकरण, कला, इतिहास, भूगोल, विज्ञान, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, मनोरंजन, पाककला, ऑटोमोबाइल्स, अर्थशास्त्र इत्यादी अनेकविध विषयांवरील जवळजवळ पंचवीस हजार ग्रंथ व इतर पुस्तके सध्या या ग्रंथालयात आहेत. इंग्रजी, मराठी, हिंदी, कोकणी, फ्रेंच व पोर्तुगीज व लॅटिन या भाषांतील काही दुर्मीळ ग्रंथही या ग्रंथालयात मिळू शकतात.
या ग्रंथालयात अलीकडच्या काळात स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे ८५ दैनिके व इतर नियतकालिके वाचकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या ग्रंथालयाचा वापर दररोज किमान पाचशे-सहाशे वाचक करीत आहेत. रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या वगळल्यास हे ग्रंथालय सकाळ-संध्याकाळ कार्यालयीन वेळांत खुले असते. या ग्रंथालयाची वाचकसंख्या सुमारे सात हजार आहे.
या ग्रंथालयाचे काही विभाग आहेत. वाचक विभागात ग्रंथालयाचे सभासद असलेल्या व्यक्तींबरोबरच इतरही व्यक्तींना वृत्तपत्रे व नियतकालिके तसेच संदर्भ पुस्तके तिथे बसून वाचण्याची मुभा दिली जाते. संदर्भ विभाग सर्व लोकांसाठी खुला आहे. त्या विभागाअंतर्गत लोकांना पुस्तके केवळ वाचनालयाच्या इमारतीतच वाचण्यास परवानगी आहे. त्याचा लाभ शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी तसेच अन्य अभ्यासकही घेतात. ‘होम लेंडिंग’ विभाग ही सेवा केवळ सभासदानांच मिळते. त्या विभागातून ग्रंथालयाचे सभासद पुस्तके घरी वाचण्यासाठी नेऊ शकतात. तसेच, अभ्यास विभाग शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोईसाठी स्थापन करण्यात आला आहे. विशेषत: परीक्षांच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार रविवारच्या दिवशीही तो खुला ठेवला जातो.
बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०००७ रोजी ‘राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन, कोलकाता’ च्या सौजन्याने या ग्रंथालयात बालकक्षाची स्थापना करण्यात आली. त्या अनुषंगाने त्या विभागात बालकांसाठी शैक्षणिक सीडींची सोय करून त्यांच्यासाठी संगणकीय व्यवस्थाही करण्यात आली. ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’च्या सहयोगाने ‘ई-ग्रंथालय’च्या माध्यमातून हे ग्रंथालय अद्ययावत करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात ई-जर्नल्सही तिथे उपलब्ध करण्यात आले आहेत.
गेल्या सुमारे तीस वर्षांच्या काळात बाळकृष्ण मणेरकर, ज्ञानेश्वर पार्सेकर इत्यादी व्यक्तींनी या ग्रंथालयाचे ग्रंथपाल म्हणून काम पाहिले आहे. या ग्रंथालयातील पुस्तकाचा वापर करून कित्येकांनी एम.फिल, पीएच. डी. साठी स्वत:चे शोधनिबंध तयार करून डॉक्टरेट व अन्य पदव्या मिळवलेल्या आहेत. बार्देश तालुक्यातील वाचकांबरोबरच पेडणे, डिचोली, सत्तरी व तिसवाडी तालुक्यातील वाचकही या ग्रंथालयाचा नित्यनेमाने वापर करीत आहेत.
या ग्रंथालयाला सरकारी अनुदान कधीच मिळाले नाही. त्यामुळे, सुरुवातीला केवळ आर्थिक व वस्तुरूपाने मिळालेल्या देणग्यांच्या आधारे हे वाचनालय चालत होते. काही काळानंतर जगन्नाथ खलप यांनी स्वतःचे दिवंगत वडील वामन शेट खलप यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीमुळे ग्रंथालयाचा थोडाफार विस्तार करणे शक्य झाले. हल्लीच ‘राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन, कोलकाता’ने काही प्रमाणात या ग्रंथालयाला आर्थिक मदत केली.
या ग्रंथालयाची निगा व देखभाल करणे शक्य न झाल्याने हे ग्रंथालय गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय म्हापसा पालिकेने घेतला आहे. ग्रंथालयाची इमारत मोडकळीस आल्याने सप्टेंबर २०१९ पासून हे ग्रंथालय वाचकांसाठी बंदच असल्याचे वृत्त दै. ‘गोमन्तक’मध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवशी गोव्याचे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी म्हापसा येथे येऊन मोडकळीस आलेल्या या ग्रंथालयाच्या इमारतीची पाहणीही केली होती. ग्रंथालयाच्या हस्तांतरणाचा करार म्हापसा पालिका व गोवा सरकार यांच्यात झाल्यानंतर या इमारतीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन त्या वेळी मंत्री गावडे यांनी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांना दिले होते. परंतु, ‘कोविड १९’ मुळे सर्व काही रेंगाळले!
.........................................

म्हापसा नगरपालिकेने सध्या हे ग्रंथालय गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्याकडे हस्तांतरित करण्याचा ठराव घेतला आहे; परंतु, अजून त्यासंदर्भातील करार होणे बाकी आहे. या ग्रंथालयाची इमारत मोडकळीस आल्याने दुरुस्तीच्या कारणास्तव हे ग्रंथालय गेल्या सप्टेंबरपासून वाचकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ‘कोविड १९’मुळे या ग्रंथालयाची दुरुस्ती लांबणीवर पडलेली आहे.
- ज्ञानेश्वर पार्सेकर,
ग्रंथपाल, आथाईद नगरपालिका ग्रंथालय, म्हापसा

............................

बार्देशमध्ये अस्तित्वात होती कित्येक ग्रंथालये!
आपला बार्देश तालुका हे लेखन तसेच वाचननिष्‍ठ शारदोपासकांचा प्रांत आहे. म्हापसा येथील आथाईड म्युनिसिपल वाचनालयातील ऐसपैस जागेत सात आठ मेजांवर प्रत्येकी नऊ-दहा व्यक्ती बसल्या आहेत आणि दररोजची वर्तमानपत्रे, साप्ताहिके तसेच मासिकांचा मनसोक्त आनंद लुटताहेत हे दृश्य नेहमीच दिसायचे. जवळच ग्रंथपाल कक्षासमोरच्या अभ्यासिकेत महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे बस्तान असायचे. संपूर्ण बार्देश परिसर आणि कामानिमित्त पेडणे भागातून म्हापशात आलेली मंडळीही वाचनप्रेमापोटी या वाचनालयात दिसायची. वाचनीय पुस्तकांचा मोठा संग्रह या ठिकाणी आहे. खरे तर हे वाचनालय म्हणजे म्हापसेकरांची शान आहे. नगरपालिकेने नव्या वास्तूत कारभार हलवला; पण, वाचन विभागाचे स्थलांतर करण्यास विलंब केला. म्हापशात ‘दुर्गा वाचन मंदिर’ (वैश्य भवन इमारत) व ‘कालिका वाचनालय’ (लक्ष्मीनारायण मंदिरासमोर चालवण्यात येते. म्हापशाच्या अलंकार थिएटरजवळ एक गाडावजा वाचनालय होते. तेथून लोक पुस्तके न्यायचे. कांदोळी येथे ‘काजा माणिक’ या आस्थापनात मुकुंद लोटलीकर यांनी वाचनालय चालवले होते. कांदोळी पंचायतीनेही एक वाचनालय सुरू केले होते. नेरूलच्या सरकारी शाळेत तसेच कळंगूटच्या पंचायतीत वाचनालये होती. एकोशी येथील ‘अनंत-राधा’ वाचनालय हेसुद्धा एक उल्लेखनीय वाचनालय.
..........................

Editing - Sanjay Ghugretkar

Goa goa

संबंधित बातम्या