कोकण रेल्वे १५ सप्टेंबरला सुरळीत होण्याची शक्‍यता

वृत्तसंस्था
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

पेडणे येथील बोगद्यात दरड कोसळल्याने ठप्प झालेला कोकण रेल्वेचा मार्ग १५ सप्टेंबरला सुरळीत होण्याची शक्‍यता आहे. त्या अनुषंगाने १६ सप्टेंबरपासून सिंधुदुर्गातून धावणाऱ्या मंगला आणि नेत्रावती एक्‍स्प्रेस गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे.

कणकवली: पेडणे येथील बोगद्यात दरड कोसळल्याने ठप्प झालेला कोकण रेल्वेचा मार्ग १५ सप्टेंबरला सुरळीत होण्याची शक्‍यता आहे. त्या अनुषंगाने १६ सप्टेंबरपासून सिंधुदुर्गातून धावणाऱ्या मंगला आणि नेत्रावती एक्‍स्प्रेस गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग - गोवा बॉर्डरवरील पेडणे येथील बोगद्यात सहा ऑगस्टच्या पहाटे दरड कोसळली होती. त्यानंतर गेला महिनाभर लांब पल्ल्याच्या मंगला, नेत्रावती, राजधानी आदी एक्‍स्प्रेस गाड्या मडगाव, लोंढा, मिरज मार्गे वळविल्या आहेत. 

गणेशोत्सवासाठी मुंबई ते सावंतवाडी या दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात आल्या. त्या पाच सप्टेंबरपासून बंद झाल्या आहेत.

कोकण रेल्वे प्रशासनाने १० सप्टेंबरला कोकण रेल्वेचा मार्ग पूर्ववत होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र पेडणे बोगद्यातील माती काढणे आणि दरड कोसळलेल्या ठिकाणी सिमेंट क्राँक्रिटची भिंत बांधणे यासाठी विलंब लागला आहे. हे काम अजून तीन ते चार दिवस सुरू राहणार असून १५ सप्टेंबरला कोकण रेल्वेचा मार्ग खुला करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्या अनुषंगाने मंगला आणि नेत्रावती एक्‍स्प्रेस गाड्यांचे    बुिंकंग   सुरू करण्यात आले आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोकण रेल्वेमार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. यामध्ये मंगला एक्‍स्प्रेस कणकवलीत, तर नेत्रावती एक्‍स्प्रेस कुडाळ स्थानकात थांबत होती. या दोन एक्‍स्प्रेसमधून मुंबईला जाण्या-येण्याची सुविधा जिल्ह्यातील प्रवाशांना उपलब्ध झाली होती. मात्र ५ सप्टेंबरपासून या दोन्ही गाड्या बंद झाल्या आहेत. याखेरीज रेल्वे मार्ग ठप्प असल्याने कोकणकन्या, जनशताब्दी या एक्‍स्प्रेसदेखील सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

संबंधित बातम्या