‘कोविड’ संसर्गाची राज्‍यपालांकडून दखल

Avit bagale
बुधवार, 15 जुलै 2020

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि ‘कोविड’ रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच आमदार, नगरसेवक, डॉक्‍टर, पोलिस, सरकारी कर्मचाऱ्यांनाही कोरानाचा संसर्गही झाला आहे. त्‍याची दखल घेत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी दुपारी चार वाजता राजभवनावर संयुक्त बैठक बोलावली आहे.

अवित बगळे

पणजी :

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि ‘कोविड’ रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच आमदार, नगरसेवक, डॉक्‍टर, पोलिस, सरकारी कर्मचाऱ्यांनाही कोरानाचा संसर्गही झाला आहे. त्‍याची दखल घेत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी दुपारी चार वाजता राजभवनावर संयुक्त बैठक बोलावली आहे. मलिक हे सक्रीय राज्यपाल म्हणून ओळखले जातात. जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांनी आपली प्रशासकीय ताकद दाखवून दिली होती.

राज्यात आल्यावर त्यांनी राज्य सरकारच्या प्रत्येक सचिवांशी स्वतंत्र चर्चा करून प्रशासकीय कारभार समजून घेतला होता. त्यानंतर पर्यावरण संरक्षण परिषदेचे अनेक वर्षांनी आयोजन केल्याबद्दल त्यांनी सरकारी यंत्रणेला ज्या पद्धतीने राजभवनावर धारेवर धरले होते, ते पाहता राज्यपालांच्‍या कार्यशैलीचा प्रत्यय सर्वांना आला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, इतर मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘मग कशाला बैठका घेता’, असे उद्विग्न उद्‍गार काढत राज्यपालांनी आपल्या रागाचा पारा किती चढतो, हेही राजभवनावर दाखवून दिले होते.

म्‍हादईप्रश्‍‍नी वेधले होते केंद्राचे लक्ष
म्हादईच्या विषयात राज्यपालांनी सक्रीय भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनच दिवसांत भेट घेऊन विषय तडीस लावला होता. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यपालांना दूरध्वनीवर संपर्क साधत कर्नाटकाला दिलेले पत्र स्थगित केल्याचे सांगितले होते. राज्य सरकार प्रयत्न करत असतानाच राज्यपालांनी काम केल्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे विरोधी पक्षाने मुक्तकंठाने राज्यपालांची स्तुती केली होती. अशा राज्यपालांनी बुधवारी कोरोनासंदर्भात बैठक बोलावल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. याचमुळे कोरोना प्रसार आणि उपाययोजनेविषयी माहिती देणारी आजची पत्रकार परिषदही घेण्यात आली नसावी.

राज्य मंत्रिमंडळात मोठे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची उद्या (ता.१५) दुपारी १२ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. इतर विषयांसोबत ‘कोविड’ रोखण्यासाठीची उपाययोजना हा विषय चर्चेला येणार आहे. ‘टाळेबंदी हवी की नको’, याविषयी राज्यात दुमत आहे. राज्य सरकार आर्थिक चाक थांबवायला तयार नाही, तर गावागावात टाळेबंदीनंतर आता कंटेन्मेंट झोन जाहीर होऊ लागले आहेत. आपल्याजवळ कोरोनाचा प्रसार होत असल्यामुळे जनतेत भितीचे वातावरण आहे. त्यातच ‘कोविड’मुळे एकूण १८ रुग्ण दगावल्याने सरकार कडक उपाययोजना कधी करणार, अशी विचारणार समाज माध्यमावर होऊ लागली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी व्यवहारांवर शिस्त आणण्यासाठी राज्य सरकार काही कडक उपाय हाती घेणार आहे. त्यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

हे राहतील उपस्थित...
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘कोविड - १९’ रोखण्यासाठी राज्य सरकारने टाकलेल्या पावलांचा आणि केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, आरोग्य सचिव नीला मोहनन, आरोग्य संचालक डॉ. जोस डिसा यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत. ‘कोविड’ टाळेबंदीच्या कालावधीपासून सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती देणारा दस्तावेज राज्यपालांना सादर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या