कुचेली मैदान आराखड्यातून गायब

कुचेली मैदान आराखड्यातून गायब
कुचेली मैदान आराखड्यातून गायब

म्हापसा: सरकारच्या आदेशानुसार उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाने म्हापसा शहराच्या नियोजन क्षेत्रातील भू-वापर नकाशा व भूवापर रजिस्टर आराखडा तयार केला होता. या नकाशासंबंधी सूचना व हरकती घेण्यासाठी म्हापसा नगरपालिका मंडळाची खास बैठक आज सकाळी पालिका सभागृहात झाली. या बैठकीत मागील काही महिन्यांपासून गाजत असलेल्या कुचेली मैदानावर चर्चा होऊन म्हापसा शहराच्या प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्यात कुचेली मैदान न दाखवल्याने काही नगरसेवकांनी हरकत घेतली. या आराखड्यात कुचेली येथील फुटबॉल व क्रिकेट मैदान दाखविण्यासाठी सूचना करून या बैठकीत एकमताने कुचेली मैदान आराखड्यात दाखविण्याचा ठराव संमत करण्यात आला.

नगराध्यक्ष रायन ब्रांगाझा यांच्या अध्यक्षतेखाली पालिका बैठक झाली. या बैठकीला आमदार तथा नगरसेवक ज्‍योसुआ डिसोझा, उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाचे सदस्य सचिव राजेंधर पंडिता, पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, उपनगराध्यक्ष श्रीमती मर्लिन डिसाझा व इतर नगरसेवक उपस्थित होते. 

कुचेली येथील कोमुनिदादच्या जमिनीत गेली अनेक वर्षे कुचेली परिसरातील तरुण फुटबॉल व क्रिकेट खेळत होते. अचानक कुचेली कोमुनिदादने या जागेवर बांधकाम करण्याचे ठरविले आहे. या प्रकाराविरोधात म्हापशातील अनेक क्रीडाप्रेमी आवाज उठवित आहेत. या आवाजाला आज प्रत्यक्ष म्हापसा नगरपालिकेतील अनेक नगरसेवकांनी पाठिंबा देत प्राधिकरणाने तयार केलेल्या नियोजन आराखड्यातून एक मैदान गायब केले आहे. मागच्या २०११च्या आराखड्यात कुचेली येथील जागा राखीव केलेल्या भू-वापर नकाशा व भू वापर रजिस्टारमध्ये पुन्हा या दोन्ही मैदानाचा समावेश करावा, अशी सूचना नगरसेवक चंद्रशेखर बेनकर, नगरसेवक संदीप फळारी, नगरसेवक राजसिंग राणे, नगरसेवक तुषार टोपले, नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी मांडली. विद्यमान नगरसेवक चंद्रशेखर बेनकर यांनी या नवीन आराखड्यात मैदानाचा समावेश करावा, असा ठराव मांडला व तो एकमताने समंत झाला.

वॉर्डनुसार चर्चा होणार
प्राधिकरणाचे सदस्य सचिव राजेंधर पंडित यांनी भूवापर नकाशा व भू वापर रजिस्टार सर्व नगरसेवकाना दाखविला व त्यांनी आपल्या लेखी स्वरूपात हरकती व सूचना मांडण्याच्या सूचना केल्या. तसेच म्हापसा शहरातील प्रत्येक वॉर्डानुसार आपण चर्चा करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. नकाशावर सर्व नगरसेवकांनी अभ्यास करावा व शक्य असल्यास आपल्या वॉर्डाचा छोटासा नकाशा तयार करून हरकती किंवा सूचना कराव्यात असे त्यांनी सांगितले. म्हापसा शहराच्या नियोजन क्षेत्रातील भू- वापर नकाशा व भू- वापर रजिस्टार या आराखड्यावर सूचना व हरकती आल्यानंतर पुन्हा आराखडा तयार केल्यानंतर नगरपालिकेकडे ठेवण्याचे आश्‍वासन आजच्या बैठकीत सदस्य सचिव पंडिता यांनी दिले. आजची बैठक दोन तास चालली शहराच्या आराखड्यावर सखोल चर्चा झाली. आजच्या बैठकीला तीन नगरसेवकांची गैरहजेरी होती.

सूचना, हरकतींसाठी मुदत वाढविली
म्हापसा शहराच्या नियोजन क्षेत्रातील भू-वापर नकाशा व भू- वापर रजिस्टर आराखडा तयार करण्यात आला आहे या नकाशासंबंधी सूचना व हरकती घेण्याचा उद्या ता. १० सप्टेंबर हा शेवटचा दिवस असल्यामुळे नगरसेवक व म्हापशातील  जनतेला हरकती व सूचना करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची सूचना नगरसेवक तुषार टोपले यांनी मांडली. मागच्या महिन्यात गणेशचतुर्थीचा सण असल्यामुळे मुदतवाढ देण्याची सूचना केली. त्यावर नगरसेवक संदीप फळारी, राजसिंग राणे, मार्टीन कारास्को व स्‍वप्नील शिरोडकर सुधीर कांदोळकर यांनी आग्रह धरला. त्यानंतर १५ दिवसांनी हरकती व सूचना मांडण्यासाठी मुदतवाढ उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाने देण्यासंदर्भात ठराव मांडला गेला व तो ठराव एकमताने समंत झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com