कुळेत आजपासून पाच दिवस लॉकडाऊन

Dainik Gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

उसगावात आज बाजारपेठ खुली, पाळीतही प्रभावी लॉकडाऊन

फोंडा

कुळे - शिगाव पंचायत क्षेत्रात तीन कोरोना रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कुळे पंचायतीने पाच दिवस पंचायत परिसर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लॉकडाऊन शुक्रवारी १२ ते मंगळवारी १६ तारखेपर्यंत करण्यात येणार आहे. या लॉकडाऊन काळात सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून प्रत्येकाने काळजी घेऊन घरातच रहावे, असे आवाहन पंचायतीतर्फे करण्यात आले आहे. कुळे - शिगाव पंचायत मंडळाने व्यापारी तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हे लॉकडाऊन घोषित केले असल्याचे सरपंच गंगाराम लांबोर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कुळे पंचायत क्षेत्र लॉकडाऊन करण्यासाठी पंचायत मंडळाची बैठक घेऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी या लॉकडाऊन काळात सहकार्य करावे असे आवाहन पंचायत मंडळाने केले असून सर्वांनी घरात रहावे, गरज असल्यासच बाहेर निघावे, मास्क तसेच इतर साहित्याचा वापर करावा, पंचायत क्षेत्रातील नागरिक जे इतर ठिकाणी कामाला आहेत, त्यांनीही खबरदारी घेऊन पंचायत क्षेत्रात गरज नसताना फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

उसगावात आज बाजारपेठ खुली
उसगावात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये म्हणून काल बुधवारी व आज गुरुवारी असे दोन दिवस बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवली होती. सर्व व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी या बंदला पूर्ण पाठिंबा दिला. फक्त फार्मसी तेवढ्या खुल्या होत्या. खासगी बसगाड्याही दोन दिवस बंद राहिल्या. बंदला दुकानदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. उसगाव भागातील ४२ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील सर्वजण आतापर्यंत निगेटिव्ह सापडले असून संशयित दोन कोरोना रुग्णांनाही डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती पंच सदस्य तुळशिदास प्रभू यांनी दिली. शुक्रवारी १२ रोजी उसगावातील लॉकडाऊन खुला करण्यात येईल, असे पंचायत मंडळाने सांगितले.

पाळी पंचायत क्षेत्रातही बंद
पाळी पंचायत क्षेत्रातील एका प्रभागात कोरोना रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाळी पंचायत क्षेत्रातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. पाळी पंचायत क्षेत्रातील या वाड्यावर एक नातेवाईक रहायला आली होती, ही महिला वास्कोतील आरोग्य खात्याशी संबंधित असून तेथे तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, ज्या कुटुंबात ती रहायला आली होती, त्या सर्वांची चाचणीही घेण्यात आली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या वाड्यावरील इतरांचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे.

कोरोनाचे संक्रमण केवळ देशातच नव्हे, तर जगात वाढत चालल्याने या महामारीपासून बचावासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. सरकारकडून आवश्‍यक उपाययोजना या महत्त्वाच्या असून सरकारी यंत्रणेकडून सॅनिटायझेशनचा प्रभावी वापर व्हायला हवा. हेळसांड होता कामा नये. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांचे सहकार्यही तेवढेच महत्त्वाचे आहे.
- प्रेमानंद चावडीकर (ज्येष्ठ सहकार कार्यकर्ता, पाळी)

 

संबंधित बातम्या