कुंडई रस्ता ठरतोय अपघातांचा ‘हॉटस्पॉट’

वार्ताहर
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

म्हार्दोळ ते भोमपर्यंत अपघातांचे सत्र, सरकारी यंत्रणेने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी

मडकई: फोंडा - पणजी महामार्गावर फर्मागुढी ते बाणस्तारीपर्यंतच्या रस्त्याचे बऱ्याच ठिकाणी अजून रुंदीकरण झाले नसल्याने या मार्गावर अपघातांचे सत्रच सुरू झाले आहे. विशेषतः म्हार्दोळ ते कुंडई व पुढे भोमपर्यंत तर सातत्याने अपघात होत असून त्यातील काही जीवघेणे ठरले आहेत. कुंडई येथे गेल्या दोन वर्षांत सात मोठे अपघात झाले असून त्यात तिघांचा बळी गेला आहे. अडिच महिन्यांपूर्वी कारगाडी व अवजड ट्रक यांच्यातील अपघातात एकजण जागीच ठार झाला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे एवढे अपघात व बळी जाऊनही या अपघातप्रवण भागात आवश्‍यक उपाययोजना मात्र काढलेल्या दिसत नाहीत. 

फर्मागुढी ते म्हार्दोळ तसेच कुंडई व पुढे भोमपर्यंतच्या रस्त्याचे आवश्‍यक त्या ठिकाणी रुंदीकरण अजून रखडले आहे. वास्तविक फोंडा ते पणजी हा चौपदरी रस्ता जाहीर केला आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने चौपदरी रस्ता करणे अत्यावश्‍यक आहे, त्यामुळे सरकारने या चौपदरी रस्त्यासाठी निविदांची प्रक्रियाही सुरू केली आहे. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे हे काम रखडले आहे. त्यातच सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याने बरीच विकासकामे अडून पडली आहेत. तसे पाहिले तर केंद्र सरकारच्या रस्ते व परिवहन मंत्रालयातर्फे या चौपदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

या योजनेतील खांडेपार ते कुर्टी - फोंडापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र पुढे फर्मागुढी ते भोम - बाणस्तारीपर्यंत रस्त्याचे काम अडून राहिले आहे. बाणस्तारी येथील पूल हा दुहेरी मार्गाचा आहे. मात्र रस्ते चौपदरी झाल्यानंतर पूलही  चौपदरी होणे गरजेचे असल्याने या पुलासाठीही निविदा काढण्यात येणार आहे. त्यासंबंधीची प्रक्रियाही सुरू आहे. 

कुंडई येथील औद्योगिक वसाहत ते पुढे भोमपर्यंतचा रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यातच मानसवाडा - कुंडई येथे एकेरी रस्ता केला आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीला विराम मिळाला असला तरी अपघातांचे सत्र मात्र सुरूच आहे. मंगेशी ते कुंडईपर्यंतचा भाग हा डोंगराचा आहे. त्यामुळे मंगेशी व कुंडईला उतरण लागते. मंगेशीची उतरण रस्ता रुंदीकरण केल्यामुळे सुसह्य ठरली आहे. त्यातच मंगेशी - म्हार्दोळ बाजारातील रस्ता वेगळा असून बगल रस्ता वेगळा आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातांना आळा बसला आहे. या मार्गावर अपघात होतात पण त्यामानाने कमी आहेत, मात्र मानसवाडा - कुंडईचा रस्ता हा तीव्र उतरणीचा आहे. त्यातच मानसवाडा - मडकई व इतर भागात जाणारा रस्ता मुख्य रस्त्याला जोडला गेला आहे. एका बाजूला उतरण तर मानसवाड्यावरून येणाऱ्या रस्त्याला चढण लागत असल्याने या ठिकाणी वाहनचालक गोंधळून जातो. मुख्य रस्त्यावरील उतरण आणि समोर जोडरस्ता, त्यातच गतिरोधक असा प्रकार असल्याने वाहनचालकांच्या गोंधळामुळे किंवा ब्रेक लागत नसल्याने अपघात होतात, त्यामुळे खरे म्हणजे कुंडईत अपघातरोधक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे येथील स्थानिक तसेच प्रवासी वर्गाची मागणी आहे. 

पंचायतींकडून पाठपुरावा...
म्हार्दोळ ते कुंडई व पुढे भोम - बाणस्तारीपर्यंत सातत्याने अपघात होत असल्याने या प्रकाराची दखल वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये, कुंडई तसेच भोम - हडकोण पंचायतींनी वेळोवेळी घेतली आहे. 

या तिन्ही पंचायतींच्या ग्रामसभांतही हा विषय सातत्याने आला असून मागच्या पंचायत मंडळांच्या बैठकीत या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजन करण्यासंबंधीचे ठराव घेऊन ते संबंधित खात्यांनाही पाठवले असल्याची माहिती या तिन्ही पंचायतींतर्फे देण्यात आली आहे.

कुंडई उतरणीमुळे गोंधळ...
कुंडई औद्योगिक वसाहतीकडून पणजीला जाणारी वाहने उतरण असल्याने वेगाने येतात, मात्र पुढे मानसवाडा येथे वाहनांच्या गतीला आळा घालण्यासाठी गतिरोधक उभारला आहे, मात्र या गतिरोधकाचा तेवढा फायदा होत नाही. कारण परराज्यातील वाहनचालकांना या ठिकाणी गतिरोधक असल्याचे मागाहून लक्षात येते, आणि अचानकपणे समोर जोडरस्ता तसेच एका बाजूला दुकाने आणि बसथांब्यासाठी उभे प्रवासी पाहिल्यावर हे परराज्यातील वाहनचालक गोंधळतात आणि अचानकपणे ब्रेक दाबल्यावर वाहन एकतरी उलटते किंवा येथील दुकानांना किंवा बगल रस्त्याच्या भिंतींना धडकते. यामुळे अपघात होत आहेत. 

संबंधित बातम्या