कुंकळ्ळीला जम्पिंग सिटी संबोधणे स्थानिक आयोजकांनी कसे सहन करून घेतले?

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

काही राजकारण्यांनी जर स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलला तर संपूर्ण शहरालाच जम्पिंग सिटी सबोधणे मूर्खपणाचे असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमावर व्यक्त होत आहेत.

कुंकळ्ळी : येथे मंगळवार ता.१७ रोजी गोंयचो एकवोट या संघटनेने कोळश्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत कुंकळ्ळी जम्पिंग सिटी म्हणजे पक्षबदलू राजकारण्याचे शहर बनल्याचा दावा केला होता. कुंकळ्ळीचे विद्यमान आमदार क्लाफास डायस  व हल्लीच गोवा फॉरवर्ड पक्ष सोडलेले युरी आलेमाव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना ok यांनी कुंकळ्ळी नगरालाच जम्पिंग सिटी संबोधले होते. विरियाटो यांचे विधान स्वाभिमानी कुंकळ्ळीकरांच्या पचनी पडलेले नसून विरियाटो यांनी स्वाभिमानी व क्रांतिकारी कुंकळ्ळीच्या भूमीला जम्पिंग सिटी संबोधल्यामुळे कुंकळ्ळीकर संतप्त बनले आहेत.

 

विरियाटो यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही राजकारण्यांनी जर स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलला तर संपूर्ण शहरालाच जम्पिंग सिटी सबोधणे मूर्खपणाचे असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमावर व्यक्त होत आहेत.
कुंकळ्ळीला जम्पिंग सिटी सबोधणा-यांनी कुंकळ्ळीकराची माफी मागावी अशी मागणी होत आहे. कुंकळ्ळीला परकीय सत्तेविरुद्ध प्रथम युद्ध लढले गेले, कुंकळ्ळीकर स्वाभिमानी व क्रांतिकारी आहेत अशा या ऐतिहासिक महत्व लाभलेल्या नगराला जम्पिंग सिटी सबोधण्याचे धाडस कोणी करू नये असा इशारा सदा देसाई यांनी दिला आहे.

कुंकळ्ळी ही स्वातंत्र्यविरांची भूमी आहे.ज्याला या भूमीचा इतिहास व महत्व माहीत नाही त्यांनी या क्रांतिकाराच्या भूमीला जम्पिंग सिटी संबोधण्याचे धाडस व आगाऊपणा करू नये. स्वाभिमानी कुकळ्ळीकर असा अपमान स्वीकारणार नाहीत असा इशारा विजय प्रभू यांनी दिला आहे.

कुंकळ्ळीत चारशे पस्तीस वर्षापूर्वी पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात प्रथम लढा दिला जो आशिया खंडातील प्रथम लढा होता. कुंकळ्ळीकरानी १५८३ ते गोवा मुक्तीपर्यत स्वातंत्र लढ्यात मोठे योगदान दिले.या भूमीत वीराबरोबरच थोर न्यायाधीश, अधिकारी व शिक्षण तज्ञ जन्मास घातले त्या भूमीला काही स्वार्थी राजकारण्यामुळे जम्पिंग सिटी संबोधणे गैर असल्याचे समाज कार्यकर्ते ऑस्कर मार्टिन्स यांनी म्हटले आहे. युरी आलेमाव याचे वडील व माजी आमदार ज्योकीम आलेमाव यांनी युरीने कुठेही उडी मारली नसल्याचे म्हटले आहे.कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी युरीने गोवा फॉरवर्ड पक्ष सोडल्याचे आलेमाव म्हणतात.आमदार क्लाफास डायस समर्थकांच्या  विरियाटो याचे विधान पचनी पडलेले नसून विकासासाठी आमदाराने भाजपात प्रवेश केलेला असून कुंकळ्ळीला विरियाटो याच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले आहे.

पूर्वी स्वराज्य व स्वधर्मासाठी लढा दिला व क्रांती केली. आता गोव्याच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कुंकळ्ळीकर क्रांती करण्यास सज्ज आहेत मात्र कुंकळ्ळीला जम्पिंग सिटी संबोधण्याचे धाडस कोणी करू नये असा इशारा रोहित नाईक या युवकाने दिला आहे. 
कुंकळ्ळीला जम्पिंग सिटी संबोधणे स्थानिक आयोजकांनी कसे सहन करून घेतले असा प्रश्नही समाज माध्यमावर विचारण्यात येत आहे. समाज माध्यमावर नेटिझनकडून विरियाटो याच्या विधानाचा समाचार घेण्यात येत आहे. त्याच बरोबर पक्षबदलू राजकारणीही टिकेचे शिकार होत आहेत.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या