कुडचडे - सांगे मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प

dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

कुडचडे - सांगे या मुख्य रस्त्यावर सांगे न्यायालयाजवळ आज दुपारी दोन वाजता आकाशीचे झाड उन्मळून पडल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली. सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी अग्निशमन दलाला पाचारण करून झाड रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.

कुडचडे
आकाशीचे झाड विद्युतभारीत वीज वाहिन्यांवर पडल्याने धोका उत्पन्न झाला होता. दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांना नागरिकांनी रोखून धरले. उपजिल्हाधिकारी अजय गावडे आणि सांगेच्या संयुक्त मामलेदार अनारिता पायस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वीज खात्याशी संपर्क साधून वीजप्रवाह खंडित करण्यात आला. त्यानंतर कुडचडे अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटविले. वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने वीजवाहिन्या तुटल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या रस्त्यावरून नेहमीच वर्दळ असते.
सांगे न्यायालय ते दांडो पेट्रोल पंप या भागात रस्ता दुतर्फा आकाशीची अनेक झाडे रस्त्यावर वाकलेल्या स्थितीत आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते दयानंद नाडकर्णी यांनी पुढाकार घेऊन झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम केले होते, पण सर्वच झाडे मुख्य रस्त्यावर वाकलेली असल्याने पावसाळ्यात धोका कायम आहे. अशी वाळलेली अन वाकलेली झाडे कापण्याची मागणी नागरिक उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करीत होते. कुडचडे अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगली कामगिरी केल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या