कुठ्ठाळीतील वीजसमस्या लवकरच सुटणार: आमदार एलिना साल्ढाणा

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

आमदार एलिना साल्ढाणा : वीज अभियंत्‍यासमवेत घेतली संयुक्त बैठक

कुठ्ठाळी: कुठ्ठाळी मतदारसंघातील वीजसमस्या लवकरच सोडविल्या जाणार, असे आश्‍‍वासन कुठ्ठाळीच्या आमदार एलिना  साल्ढाणा यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. उपासनगर येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला वीज खात्याच्या वास्को विभाग-११ चे प्रभारी कार्यकारी अभियंता पावलितो व्हिएगस, वेर्ण्याचे विभाग-१४ चे सहाय्यक अभियंता जुझे लुकास, विभाग-१६ चे सहाय्यक अभियंता मारीओ मस्कारेन्हस व विभाग-१६ चे कनिष्ठ अभियंता सूरज पालयेकर यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

गेल्या काही काळात वेर्णा उपकेंद्र येथील १० हजार एमव्हीए ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने कुठ्ठाळी व केळशी गावामध्ये विजेच लपंडाव सुरू आहे. यासाठी सांकवाळ उपकेंद्रावरून या गावांना वीज पुरविण्यात आली. मात्र, अतिदाबाचा पुरवठा झाल्‍यास कुठ्ठाळी, केळशी व सांकवाळ गावांना वारंवार वीज समस्या निर्माण होते. त्‍यावर उपस्थित असलेल्या वीज अभियंत्यांनी सांगितले की, नादुरुस्त झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी तात्पुरता ८ हजार एमव्हीए ट्रान्सफॉर्मर आम्ही बसनला आहे आणि केळशी - कुठ्ठाळी गावांना वीज पुरवली. लवकरच १० हजार एमव्हीए ट्रान्सफॉर्मर कायमस्वरुपी बसविण्यात येईल.

यावेळी आमदार अलिना साल्ढाणा यांनी सांगितले की, या दोन्ही गावांसाठी ११ केव्ही उच्च दाबाच्‍या भूमिगत वीज वाहिन्‍यांचे काम चालू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे कागदोपत्री काम पूर्ण झाले असून कामाची ऑर्डर देण्यात आली आहे. कोविड महामारी व पावसामुळे हे काम रखडले आहे. त्‍या कामासाठी सुमारे नऊ कोटी खर्च आहे. माझ्या मागील आमदराकी काळातच सध्याची ११ केव्ही उच्चदाब वाहिनी जी खासकरून पावसात निकामी होते, त्याजागी भूमिगत केबल घालण्याचा प्रस्ताव आपण तयार केला होता. मात्र, काही कारणाने तो त्यावेळी मंजूर झाला नाही. आता हे प्राधान्य स्वरुपावर हाती घेण्यात येणार आहे. तसेच बिर्ला सांकवाळ ते कोलवा क्रॉस जंक्शनपर्यंत सुमारे ७ कोटींचा खर्च करून बिर्ला उपकेंद्रापासून भूमिगत केबल्स घालण्यात येणार आहेत. यासाठीच्या कामाची ऑर्डर देण्यात आली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

त्याचप्रमाणे सांकवाळ, कासावली व वेळसाव  गावासह इतर भागामध्येही भूमिगत केबल्स चे काम करवून घेण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव मांडला जाईल. सिद्धार्थ कॉलनी-झुआरीनगर, हाऊसिंग बोर्ड कॉलनी उपासगर व पाझेंतर येथे प्रत्येकी १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर्स बसविण्यात येतील, असे एलिना साल्ढाणा यांनी सांगितले. असा प्रकारे कुठ्ठाळी मतदारसंघातील विविध वीज समस्यांचे निराकरण करण्याचा माझा व विद्यमान सरकारचा प्रयत्न आहे. नागरिकांनी समस्या निराकरण होईपर्यंत गैरसोय सोसून वीज खात्याला सहकार्य करावे, अशी विनंती आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या