बेकायदा रेती उत्खननासाठी मजूर दाखल

निवृत्ती शिरोडकर
शुक्रवार, 31 जुलै 2020

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पेडणे तालुक्यातील तेरेखोल व शापोरा नदीत बेकायदा रेती उपसा करणारे हजारो मजूर गावाला परतले होते. आता पुन्हा ३० ते ४० बिहार, उत्तरप्रदेश येथील मजूर परत पोरस्कडे न्हयबाग भागात रेती उत्खननासाठी दाखल झाले आहेत.

मोरजी
दोन्ही नद्यांमधील रेती उत्खन लॉकडाऊन काळात तात्पुरते बंद आहे. या काळात हजारो ट्रक रेती घेवून महाराष्ट्र भागातून राज्यात दाखल होतात. त्यावर सरकारी यंत्रणेचे अजिबात लक्ष नाही. उलट स्थानिकांनी रेती घेवून वाहतूक केली, तर तिथे लगेच पोलिस पोचतात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात. मात्र, बाहेरून येणाऱ्या रेती वाहतूकदारांना सीमा भागातील नाके मोकळे करून दिले जात आहेत.
रेती व्यवसाय हळू हळू पेडणे तालुक्याचा आर्थिक कणा समजला जातो. त्यात पोलिस, सरकारी कर्मचारी, सरपंच, पंच, उपसरपंच रेती व्यवसाय करतात. किमान ५००० कुटुंबे या रेती व्यवसायावर अवलंबून आहेत. हजारो मजूर या बेकायदा रेती व्यवसायात गुतलेले असतात. पोटासाठी ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात. जीव धोक्यात घालून हे मजूर नदीत होड्या घेऊन वाट्टेल तिथील रेती काढत असतात.
जशी पाच हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्याचप्रमाणे ९०० पेक्षा जास्त वाहने या रेती व्यवसायाशी निगडीत आहेत. रेती व्यवसाय कायदेशीर करण्यासाठी सरकारने जे नियम व अटी घातलेले आहेत ते व्यावसायिक १०० टक्के पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे अधिकाधिक व्यावसायिक चोरमार्गाने हा व्यवसाय करत असतात. या बेकायदा व्यवसायात कोण कोण गुंतलेले आहेत त्याची सर्व माहिती पोलिस, खाण आणि भूगर्भ खाते यांना आहे. मात्र, कारवाईच्या नावावर धूळफेक केली जाते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बागायती, शेतीचे नुकसान
निसर्गाची आपत्ती आली तर समजता येते, पण माणसानेच आपत्ती घडवून आणली तर दाद कुणाकडे मागावी, अशी स्थिती आहे. ज्या भागात रेती काढली जाते, त्या भागातील नदीचे पात्र रुंदावून लाखो चौरस मीटर जमीन पाण्यात गेली आहे. हळू हळू नदी परिसरातील बागायती, शेती या पाण्याखाली आली आहे. हजारो नारळाची झाडे नदीत कोसळत आहेत आणि बागायतदार आपले नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे दुसरे काहीही करू शकत नाहीत.

रस्त्याला व पुलाला धोका
या परिसरात मोठ्या प्रमाणात रेती व्यवसाय चालू असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला आहे.
मागच्या पंधरा दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्ग ६६ या रस्त्याचा १०० मीटर भाग तेरेखोल नदीत वाहून गेला आणि ४०० मीटर रस्ता पाण्यात जाण्याचा धोका निर्माण केला आहे. हा प्रकार परिसरातील नदीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा झाल्याने आणि चालू असल्याने हा रस्ता खचलेला आहे. आता कोकण रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या