माशेलात रोजंदारीच्या प्रतीक्षेत मजूर

मजुूर
मजुूर

माशेल ः रोजंदारीच्या प्रतीक्षेत बसलेले मजूर. (घुग्रेटकर)
खांडोळा

माशेल पंचक्रोशीत दररोज सकाळी बसस्थानकातील भाजी मार्केट परिसरात किमान ३५०-४०० मजूर रोजंदारीच्या प्रतीक्षेत सकाळी ७ वाजता उभे असतात. काही प्रमाणात कामे सुरू झाल्यामुळे बिहार, उत्तरप्रदेश, ओरिसा, झारखंडमधील मजूर आपली रोजची मजुरी ठरवून कामावर जातात. घरी जाण्याची व्यवस्था होईपर्यंत तरी काम करायला हवे, रोजच्या जेवणाची समस्या आहे. कोणीही मोफत जेवण देत नाही. त्यामुळे मिळेत ते काम करतो, असे येथील कामगारांनी सांगितले.
बांधकाम व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला असून अर्धवट असलेली कामे पूर्ण करण्याकडे कंत्राटदारांचा कल दिसतो. त्यामुळे दररोज सकाळी आवश्यक मनुष्यबळ घेऊन कामे पूर्ण केली जात आहेत. मोठी कामे कोणीही सुरू केलेली नाहीत. त्यामुळे बाजारात आलेल्या सर्व मजुरांना काम मिळत नाही. त्यामुळे मिळेल ते काम मजूर करीत आहेत. मजुरींही काही प्रमाणात कमी केली आहे. रिकामी बसण्यापेक्षा काही काम केलेले बरे म्हणून काही जण कोणतेही काम स्वीकारत आहेत. भूखंड, घर परिसर, बागेतील साफसफाईची कामेही करीत आहेत.
खांडोळा-माशेलातील जवळ जवळ ११०० मजुरांनी परतीसाठी पंचायतीत नाव नोंदवले होते. यापैकी सुद्धा अनेकजण वाहतूक व्यवस्था सुरू झाल्यानंतर विचार करू असे सांगत आहेत. बऱ्याच कामगारांना गोवा सुरक्षित असून येथे रोजगार मिळतो. गावी जाऊन काय करायचे? तेथे सुरक्षितता नाही, शिवाय प्रवासात काही झाले तर काय करणार? त्याप्रमाणे काही मजुरांचा मुले परिसरातील मराठी, कोकणी शाळेत प्राथमिक शिक्षण घेत आहेत. त्यांना शाळेसाठी पुन्हा गोव्यात यावेच लागणार आहे. त्यामुळे हे कामगार आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे यंदा आपण गोवा सोडणार नाही, असाच निर्धार त्यांनी केला आहे.
गोवा सुरक्षित असल्याने येथे पुन्हा रोजगार मिळेल. आता कामे सुरू झाली आहेत, त्यात वाढ होईल, त्यामुळे गोव्यातच राहणे आपल्यासाठी योग्य आहे, असेही झारखंडच्या मजुरांनी सांगितले. हे मजूर माशेल, खांडोळा, आमोणा परिसरात राहतात, पण सकाळी काम मिळण्याचे एकमेव ठिकाणी माशेल बसस्थानक परिसरात असल्याने तेथे येतात. यापैकी काहींना काम मिळते, तर काहींना काम मिळत नसल्याने आणलेला डबा घेऊन आपल्या घरी परततात. या परिसरात कर्नाटकातील बरेच मजूर होते. पण त्यांची व्यवस्था गोवा- कर्नाटक सरकारने केल्यामुळे गेल्या आठवड्यात कणकुंबी येथून आठ बसेसमधून आपापल्या गावी परतले. त्यामुळे त्यांची संख्या कमी आहे. काही मोजकेच कर्नाटकातील मजूर येथे आहेत. तेही येत्या आठवड्यात आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांना त्यांच्‍या परिसरातील नेत्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे परतीची सोय करण्यात येत आहे.

पेंटिंग व्यवसाय जोरात
घरांचे पेंटिंग करणारे पेंटरही या परिसरात जवळ जवळ स्थायिक झालेले आहेत. ते परिवारासह येथे राहतात. त्यामुळे त्यांनी गावी जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांची मुलेही येथे शिकतात. काहींच्या परीक्षा व्हायच्या आहेत. शिवाय धंदाही चांगला चाललाय. बऱ्याच ठिकाणी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात झालेली आहे. हार्डवेअर व्यवसाय, स्वीटमार्ट चालक, विद्युत उपकरणे विक्री, दुरूस्तीही सुरू झालेली आहे. त्यामुळे या धंद्यातील बरेच परप्रांतीय नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com