पणजीत कोविड किटसाठी रुग्णांची ससेहोलपट

covid kit
covid kit

पणजी: कोरोना चाचणीनंतर ‘पॉझिटिव्ह’ (Corona Report) अहवाल आलेल्या व प्राणवायूची आवश्‍यकता नसलेल्या रुग्णांना गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला देताना ‘कोविड किट’ (Covid-Kit) आरोग्य केंद्राकडून दिले जात होते, मात्र सध्या ‘कोविड किट’च्या तुटवड्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना तो मिळवण्यासाठी धावपळ करण्याची पाळी आहे. हे किट नसल्यास कोरोनाबाधित रुग्ण गृह अलगीकरणाचा पर्याय स्वीकारू शकत नाही. त्यामुळे या रुग्णांची बरीच ससेहोलपट होत आहे. ‘कोविड किट’ रुग्णांना न मिळण्याचे प्रकार राज्यात बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहे. कोरोना बाधित रुग्णांना किट संपल्याचे सांगण्यात येते व त्यांना कागदावर उपचारासाठी गोळ्या लिहून दिल्या जातात, मात्र ऑक्सिमीटर (Oximeter) तसेच थर्मामीटर देण्यात येत नाही. (Lack of covid kit in Goa)

गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना ऑक्सिमीटरने प्राणवायू किती आहे, तापमान किती याची माहिती तीनवेळा दिलेल्या चार्टवर लिहावी लागते. रुग्णांना तीनवेळा डॉक्टरांचा त्यांनी दिलेल्या मोबाईलवर फोन येतो व विचारपूस केली जाते. ऑक्सिमीटरचे व तापमानाचे प्रमाण विचारण्यात येते, मात्र त्यासाठी ही दोन्ही आरोग्य केंद्राकडून दिले जात नसल्याने ही माहिती रुग्ण कशी काय उपलब्ध करणार? काही कोरोना बाधित रुग्ण गृह अलगीकरणात आहेत, मात्र त्यांच्याकडे ‘कोविड किट’ नाही अशी नाजूक परिस्थिती सध्याची आहे.

‘कोविड किट’चा तुटवडा

आरोग्य केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या ‘कोविड किट’चा तुटवडा असल्याची माहिती काही खासगी दुकानधारकांनी ऑक्सिमीटर व थर्मामीटर उपकरणाच्या किंमती वाढवल्या आहेत. ते सुद्धा आता मिळेनासे झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना कोविड किटमधून देण्यात येणाऱ्या गोळ्यांचाही फार्मसीमध्ये तुटवडा होऊ लागला आहे. त्यामुळे सामान्य कोरोनाबाधित लोकांना या महामारीत आधीच संकटात असताना या भूर्दंड सहन करण्याची पाळी आली आहे. काही आऱोग्य केंद्राकडे हे किट नसल्यास ते जवळच्या आरोग्य केंद्राकडे कोरोनाबाधित रुग्णाला पाठविले जाते. त्यामुळे या रुग्णाला गृह अलगीकरणात राहण्याऐवजी या ‘किट’ एका केंद्रातून दुसऱ्या केंद्राकडे धावपळ करत हेलपाटे मारावे लागत आहेत. दुसऱ्या आरोग्य केंद्राकडून हे किट मिळेलच याची शाश्‍वती नसते. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण हे बाहेर मिसळत असल्याने त्याचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑक्सिमीटर किंवा थर्मामीटर गेले कोठे?

काही आरोग्य केंद्रावर कोविड किट नाही, मात्र त्या किटमध्ये असलेल्या गोळ्याच कोरोना बाधित रुग्णांना दिल्या जातात. त्यामुळे या किटमध्ये असलेले ऑक्सिमीटर किंवा थर्मामीटर गेले कोठे याची सरकारने संबंधित आरोग्य केंद्राकडून सविस्तर तपशील घेण्याची वेळ आली आहे. या किटचे वितरण करण्यातही बराच भ्रष्टाचार सुरू असल्याचा लोक उघडपणे बोलत आहेत. दरदिवशी सुमारे अडीच ते तीन हजार कोरोना संसर्ग रुग्ण सापडत आहेत, तर त्यांना हे किट पुरवण्यासाठी सरकारने व्यवस्था केली असल्याचे भासवित असले, तरी त्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होऊ लागला आहे. सध्या सरकारचे लक्ष प्राणवायू व खाटांची व्यवस्था करण्याकडे अधिक असल्याने या ‘कट’च्या तुटवड्याबाबत कोणीच अधिकारी बोलत नाहीत.

90 टक्के कोरोना घरीच

राज्य सरकारने तीव्र कोरोनाची लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला देते तो मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेले ‘कोविड किट’ संपले तरी त्याची व्यवस्था करत नाही. सरकारी इस्पितळात कोरोना रुग्णांसाठी असलेल्या खाटा कमी पडत असल्याने 90 टक्के कोरोना बाधितांना गृह अलगीकरणात राहण्याचे आवाहन करून त्यांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचा आरोप कोरोनाबाधित रुग्ण करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com