मडगाव बस स्थानकावर अनेक सुविधांची कमतरता

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

दक्षिण गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने निश्चित केल्यानुसार वेगवेगळ्या सरकारी खात्यांचे अधिकारी व ग्राहक आणि रस्ता सुरक्षेशी निगडीत संस्थांच्या प्रतिनिधींनी आज मडगाव बस स्थानकाची पाहणी करून तेथील सुविधांचा आढावा घेतला.

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने निश्चित केल्यानुसार वेगवेगळ्या सरकारी खात्यांचे अधिकारी व ग्राहक आणि रस्ता सुरक्षेशी निगडीत संस्थांच्या प्रतिनिधींनी आज मडगाव बस स्थानकाची पाहणी करून तेथील सुविधांचा आढावा घेतला. या पाहणीत बसस्थानकावर प्रवासी व ग्राहकांसाठी आवश्यक अनेक सुविधांची कमतरता दिसून आली. या पाहणीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रुचिका कत्याल यांना पाठवण्यात येणार आहे. 

वाहतूक खात्याचे दक्षिण गोवा उपसंचालक आयव्हो राॅड्रिग्ज यांनी या पाहणीचे संयोजन केले. या पथकात वाहतूक खात्याच्या अमलबजावणी विभागाचे वाहन निरीक्षक जीमरीव्हस रिबेलो, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहाय्यक अभियंते राजेश गावडे, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या निरीक्षण विभागाच्या सदस्य लाॅर्ना फर्ऩांडिस, मडगाव वाहतूक  विभागाचे पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर, मडगाव कदंब बसस्थानकाचे व्यवस्थापक गिरीश गावडे व गोवा कॅन संस्थेचे निमंत्रक रोलंड मार्टीन्स यांचा समावेश होता. 

बसस्थानकावर प्रवाशांसाठी आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार संच, दिव्यांगांसाठी चाकांची खुर्ची, अग्नीरोधक यंत्रणा, बसेसचे येण्याजाण्याचे वेळापत्रक, अतिरिक्त कचरा कुंड्या, सीसीटीव्ही कॅमेरा, अतिरक्त दिवे, आणिबाणीच्या प्रसंगासाठी मदतीसाठी हेल्पलाईन नंबर, कोकण रेल्वे स्थानकावर येजा करण्यासाठी बसची उपलब्धता आदींची गरज असल्याचे पाहणी पथकास दिसून आले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकावर बसेसचा प्रवेश मार्ग व पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडण्याची जागा बदलण्याची गरज असल्याची नोंद या पथकाने केली. बसस्थानकावर दुचाकी पायलट व रिक्षा पार्क करण्यासाठी योग्य व्यवस्थेची गरजही या पथकाला दिसून आली. 

संबंधित बातम्या