नेटवर्क नसल्याने 'ऑनलाइन' शिक्षणावर परिणाम विद्यार्थ्यांसह पिळगाववासीयांना प्रतीक्षा मोबाईल टॉवरची

Dainik gomantak
सोमवार, 22 जून 2020

'कोविड' महामारीच्या संकटामुळे शाळा सुरू होणे लांबणीवर पडल्याने सध्या ऑनलाइन शिकवणी चालू आहे. मात्र, पिळगावात मोबाईल नेटवर्क नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी घरापासून लांब जावे लागते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षणावरही परिणाम होत आहे. त्यासाठी तत्परतेने ही समस्या सोडवावी.
-गौतमी परब गावकर, विद्यार्थी.

डिचोली,  : 'कोविड' महामारीच्या संकटामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडल्याने आता अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण उपक्रम सुरू केला आहे. ऑनलाइन शिक्षण घेणे सक्‍तीचे नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले असले, तरी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळावे. म्हणून काही शाळांनी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला असून, विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन शिक्षण घेण्यास सुरवात केली आहे. मात्र, डिचोलीतील पिळगाव गावातील विद्यार्थ्यांसमोर 'नेटवर्क'ची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गावात मोबाईल नेटवर्कअभावी इंटरनेट मिळत नसल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागत आहे.

मोबाईल टॉवरची प्रतीक्षा !
पिळगावात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने पिळगाववासीयांची मोठी अडचण होत असते. इंटरनेट वा अन्य सोशल मीडियाच्या वापरासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. मोबाईल नेटवर्कची ही अडचण लक्षात घेता गावात मोबाईल टॉवर उभारावा. अशी विद्यार्थ्यांसह पिळगाववासीयांची गेल्या काही वर्षांपासूनची मागणी आहे. पंचायतीच्या काही ग्रामसभेतही मोबाईल टॉवर मागणीच्या विषयावर चर्चा झाली. वर्षापूर्वी झालेल्या ग्रामसभेत पिळगावात मोबाईल टॉवर उभारावा. असा ठरावही एकमताने संमत करण्यात आला आहे. मात्र, अजूनपर्यंत तरी पिळगाववासीयांची ही मागणी फलद्रुपास आलेली नाही. दरम्यान, मोबाईल टॉवर उभारण्यासाठी आवश्‍यक सोपस्कार पूर्ण झालेले आहेत. फक्‍त टॉवर उभारणीचे काम बाकी असल्याची माहिती पंचायतीकडून मिळाली आहे.

'कोविड' महामारीच्या संकटामुळे शाळा सुरू होणे लांबणीवर पडल्याने सध्या ऑनलाइन शिकवणी चालू आहे. मात्र, पिळगावात मोबाईल नेटवर्क नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी घरापासून लांब जावे लागते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षणावरही परिणाम होत आहे. त्यासाठी तत्परतेने ही समस्या सोडवावी.
-गौतमी परब गावकर, विद्यार्थी.

आजच्या ऑनलाइन जगात पिळगावात मोबाईल टॉवर असणे, ही काळाची गरज आहे. मोबाईल टॉवर व्हावा. अशी नागरिकांची मागणी आहे. ग्रामसभेतही हा विषय चर्चेला येवून टॉवर उभारावा. असा ठराव संमत करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींमुळे मोबाईल टॉवर उभारण्याची प्रक्रिया लांबली असली, तरी आता टॉवरसाठी पंचायतीच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळण्याची आशा आहे. रिलायन्स जिओ कंपनीतर्फे पिळगावात मोबाईल टॉवर उभारण्याची सहमती दर्शवली आहे.
- प्रदीप नाईक, मावळते सरपंच.

संबंधित बातम्या