कामगारांअभावी मान्सूनपूर्व कामांत अडथळा

dainik gomantak
गुरुवार, 21 मे 2020

टाळेबंदीच्या काळात पंचायत संचालयनालयाने कामगारांना काम देऊन पंचायत क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे करण्यास सांगितले आहे.

पणजी, 

चिंबल ग्रामपंचायत क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष या मथळ्याकडे दैनिक 'गोमंतक'मध्ये बुधवारी वृत्त प्रसिद्ध झाले. या कामाविषयी सरपंच चंद्रकांत कुंकळ्ळकर यांच्याशी काल मंगळवारी संपर्क साधला होता, परंतु संपर्क न झाल्याने पंचायतीची यामागील भूमिका स्पष्ट झाली नाही. परंतु सरपंच कुंकळ्ळकर यांनी आज ‘गोमन्तक'शी संपर्क साधून आपली भूमिका मांडली.
टाळेबंदीच्या काळात पंचायत संचालयनालयाने कामगारांना काम देऊन पंचायत क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे अनेक पंचायतीने कामेही केली, परंतु चिंबलमध्ये पंचायतीने काम हाती घेतले आणि कामगार गावाला गेले, असा प्रकार घडला आहे. याविषयी सरपंच कुंकळ्ळकर म्हणाले की, टाळेबंदीमुळे पंचायतीला काहीच कामे करता आली नाहीत. अनेक कामांच्या निविदा काढल्या गेल्या, पण कामगारांअभावी कंत्राटदारांनी काम सुरू केले नाही. त्यामुळे गटारे स्वच्छतेची कामे बाकी राहिली आहेत.
चिंबल परिसरातील अनेक ठिकाणची गटारे अजूनही तुंबलेली आहेत. काही इंग्रजी दैनिकांत येथील स्वच्छतेची कामे पूर्ण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने चिंबल मंचच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी दैनिक 'गोमन्तक' शी संपर्क साधून वास्तव स्थिती काय आहे, ती पुढे आणण्याची मागणी केली. त्यानुसार गोमन्तकने आजच्या अंकात चिंबलमधील वास्तव पुढे आणले. त्यानुसार सरपंच कुंकळ्ळकर यांनी संपर्क साधून मांडलेली भूमिकाही आता मांडण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या