काणकोणात पडीक जमीन झाली सुपीक

dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

काणकोणात गेली २५ वर्षे पडीक असलेली शेती जमीन टाळेबंदीच्या काळात नांगरण्यात आली आहे. त्यानिमित्ताने युवा पिढी कृषी क्षेत्रात उतरली. खालवडे येथील शेकडो एकर शेतात भाजी पीक घेण्यात येणार असून त्यामध्ये येथील जमिन मालक लक्षा शेट, सुभाष शेटे, राजेश शेट व संजय शेटे यांनी भाजी व गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचीही लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.

काणकोण
त्यांनी या लागवडी भोवती कुंपण घातले आहे. सूरज गावकर व राजेंद्र देसाई यांनी भाताची लागवड केली आहे. त्याशिवाय प्रल्हाद वेळीप, विशाल प्रभूदेसाई, सचिन नाईक या युवा शेतकऱ्यांनी भाजी लागवड केली आहे. प्रसाद वेळीप याची उसाची लागवड आहे. या शेतकऱ्यांनी मिरची व इतर काही पिकेही उत्तमप्रकारे घेतली आहेत.
काणकोणात यंदा ३०० हेक्टर जमीन भाजी लागवडीखाली आणण्यात आली आहे. त्यामध्ये गावठी भाजी बियाणाबरोबरच संकरित भाजी बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. इंडेम ००३ व इंडेम ००४ या नवीन भाताच्या बियाणी शेतकऱ्यांना प्रयोगिक तत्त्वावर लागवडीसाठी देण्यात आली आहेत. १०५ व १२५ दिवसांनी या बियाणाचे भातपीक कापणीस तयार होते. त्याशिवाय दापोलीची वाण असलेली श्री व नाचणी बियाणे काणकोणात दाखल करण्यात आले आहे. आगोंदा, श्रीस्थळ येथील शेतकऱ्यांना ही बियाणी देण्यात आली आहेत. गेल्यावर्षी ८० हजार चौरस मीटर शेतजमिनीची यांत्रीक पद्धतीने लागवड करण्यात आली होती यंदा त्यामध्ये दुप्पटीने म्हणजे १ लाख ६० चौरस मीटर शेतजमिनीत पेरणी यंत्राने लागवड करण्यात आली आहे. एकमेव खाल्ले भागात गेल्या पंचवीस वर्षे लागवड न केलेली शेती जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे.
या ठिकाणी २ हेक्टर शेतजमीन नव्याने लागवडीसाठी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये काहींच्या जमिनीत भाजी व गुरांसाठी चाऱ्याची लागवड करण्यात येणार आहे. त्याशिवाय काही भागात भातपिकाची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यांत येणार आहे. पैंगीण पंचायत क्षेत्रातील कुंभेगाळ येथे युवकांनी भाजी लागवड केली आहे. देवाबाग येथे टिना कोमरपंत यांनी गुरांसाठी खाद्य तृणाची लागवड हातात घेतली आहे, असे विभागीय कृषी अधिकारी शिवराम नाईक गावकर यांनी सांगितले.
लोलयेचे माजी सरपंच विद्यमान पंच अजय लोलयेकर यांनी यंदा आठशे काजू कलमांची लागवड केली आहे.त्याशिवाय मोठे तळे शेतजमिनीत खोदले आहे. कृषी खाते शेतकी व्यवसायाला चालना देत आहे, मात्र कृषी माल खरेदी करणारे हॉर्टीकल्चर महामंडळ कृषी मालाला चांगला भाव देत नसल्याची युवा शेतकऱ्याची कैफियत आहे. काणकोणात जून अखेरपर्यंत ४२ इंच पाऊस झाला आहे. पाऊस समाधानकारक झाल्यामुळे मिरची पिकांबरोबरच भातशेतीला तो पोषक आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक पीक येण्याची अपेक्षा विभागीय कृषी अधिकारी शिवराम नाईक गावकर यांनी व्यक्त केली.

Goa Goa Goa Goa Goa Goa Goa

संबंधित बातम्या