मडगाव मार्केट परिसर बनला ‘ मिनी सोनसडो’

वार्ताहर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

मडगावात ‘एसजीपीडीए’ किरकोळ मार्केट प्रकल्पाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या सुलभ शौचालयाजवळील परिसरात मोठ्या प्रणाणात कचरा साठल्याने हा परिसर ‘मिनी सोनसडो’ बनला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. 

नावेली: मडगावात ‘एसजीपीडीए’ किरकोळ मार्केट प्रकल्पाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या सुलभ शौचालयाजवळील परिसरात मोठ्या प्रणाणात कचरा साठल्याने हा परिसर ‘मिनी सोनसडो’ बनला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. 

मार्केटमध्ये तयार होणारा भाजी, चिकन, मासळी कुजलेल्या फळांचा कचरा फेकण्यात आल्याने परिसरातील वातावरण गलिच्छ बनले आहे. या कचऱ्यावर मडगावातील भटकी गुरे ताव मारत असतात. कचऱ्यामुळे किडे पसरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी काही महिला दुचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतात. मार्केटमधील व्यापारी तसेच मासे विक्रेत्या महिलांना सुलभ शौचालयाचा वापर करावा लागत आहे. फेकण्यात आलेला भाजीच्या कचऱ्याला किडे पडल्याने सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे नाक मुठीत धरून जावे लागत आहे.

कचरा उघड्यावर फेकण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने गुरे साचलेल्या पाण्यात बसतात. कचरा साठलेल्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर सरकारी आस्थापने आहेत. येथील कर्मचाऱ्यांना या कचऱ्याच्या उग्रवासाचा सामना करावा लागत आहे़. पावसाचे पाणी साचल्याने डासांची पैदास होत असून, परिसराला ओंगळवाणे स्वरुप प्राप्त झाले आहे. 

स्थानिक नगरसेवक लिंडन मोंतेरो यांनी आपण ज्यावेळी एसजीपीडीए सदस्य होतो, त्यावेळी या कचऱ्याची विल्हेवाट फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्याप्रकारे होत होती. एसजीपीडीएने मार्केट सफाईचे कंत्राट खासगी एजंसीला दिले असून, या कचरयाची विल्हेवाट लावण्यासाठी जबाबदारी ‘एसजीपीडीए’ची असल्याचे मोंतेरो यांनी सांगितले.

पाच महिन्यांपासून कचऱ्याची उचल नाही
गेल्या पाच महिन्यांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. दूषित कचऱ्याचा डोंगर झालेला आहे. सुमारे १०० मीटर अंतरावर दक्षिण गोवा जिल्हा न्यायालय आहे, तर काही अंतरावर ‘एसजीपीडीए’ कार्यालय आहे. आयकर विभाग व अबकारी कार्यालय आहे. मासळी मार्केट भाजी मार्केट आहे, त्यामुळे येथील लोकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या कचऱ्याच्या ठिकाणी पाण्याचे डबके साठले आहे.

संबंधित बातम्या