लाटंबार्से औद्योगिक वसाहत बेरोजगारांसाठी लाभदायक

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्याची गरज व्यक्त होत असून लोकांच्या रोजीरोटीसाठी लवकरात लवकर उद्योग सुरू होण्याची लोकांना प्रतीक्षा आहे.

अस्नोडा:  गेल्या काही वर्षांपासून नियोजित लाटंबार्से औद्योगिक वसाहत सुरू होण्याची नवोदित उद्योजक, बेरोजगारांची उपेक्षा. नव्याने उभ्या राहात असलेल्या या औद्योगिक वसाहतीमुळे अस्नोडा, मुळगाव, लाट॑बार्से, अडवलपाल, मेणकुरे-धुमासे, शिरसाई, थिवी आदी पंचायत क्षेत्रातील होतकरू नवउद्योजकांना आपले उद्योग सुरू करता येणे शक्य होणार आहे. 

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्याची गरज व्यक्त होत असून लोकांच्या रोजीरोटीसाठी लवकरात लवकर उद्योग सुरू होण्याची लोकांना प्रतीक्षा आहे. लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग- व्यवसाय बंद झाल्यामुळे गोव्याच्या ग्रामीण भागातील हजारो कर्मचारी युवकांना घरी बसावे लागलेले आहे. कमावता असलेला आधार अचानकपणे बेरोजगार झाल्यामुळे एखाद्या कुटुंबाला जो मनस्ताप सहन करावा लागतो, तसा मनस्ताप ग्रामीण भागातील लोकांना सहन करावा लागत आहे. याची दखल कोणीतरी केव्हा तरी घेईल, याची त्या॑ना मोठी उत्कंठा लागून राहिलेली आहे. शासनाची किंवा कुठल्याही महामंडळाची अथवा कुठल्याही आस्थापनाची एखादी जागा भरावयाची असल्यास त्या जागेसाठी हजारो गोमंतकीय तरुणांच्या रांगा लागतात. अशी गंभीर परिस्थिती सध्या ग्रामीण भागातील युवावर्गावर ओढवलेली आहे.

बेरोजगार तरुणांच्या वाढत्या वयाची चिंता त्यांच्या पालकांना सतावत असून त्यावर काही उपाय काढू न शकल्यामुळे ते हताश बनलेले आहेत. ही केविलवाणी परिस्थिती बदलण्याची लोकांना उत्कंठा आहे.
ग्रामीण भागातील समाजमनाची ही अवस्था जाणून घेऊन शासनाने खोळंबलेले लाटंबार्से औद्योगिक वसाहती सारखे उपक्रम लवकरात लवकर मार्गी लावावेत, अशी जागरुक नागरिकांची आग्रही मागणी आहे.

संबंधित बातम्या